गणेश पवार - नेवरी --कडेगाव तालुक्यात ताकारी, टेंभू योजनेमुळे शेतकरी शेती व्यवसायावर जास्त भर देऊ लागले आहेत. त्यामुळे कृषी विभागाच्या योजनेकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या गांधारीच्या भूमिकेमुळे बऱ्याच प्रकारचे प्रस्ताव धूळ खात कार्यालयात पडून आहेत. अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे कृषी विभागाचा कारभार अनागोंदी झाला असून, तालुका कृ षी अधिकारी एन. टी. पिंजारी व संबंधित अधिकाऱ्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील निकृष्ट बंधाऱ्यांची संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करावी. निकृष्ट कामामुळे शेतकऱ्यांतून कृषी विभागाबाबत संतापाची लाट निर्माण झाली आहे.गेल्या पाच ते सहा वर्षांपासूून या विभागाकडून शेतकऱ्यांच्या पदरी केराच्या टोपल्या देण्यात आल्या आहेत. कृषी विभागामार्फत राज्याकडून आलेल्या नवनवीन योजना तालुक्यातील पांढरपेशी लोकांनाच वाटल्या जातात. बऱ्याचदा शेतकऱ्यांनी याबाबत तक्रारी करूनही त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे आतापर्यंत शेततळी, पॅक हाऊस, माती बंधारे, सिमेंट बंधारे असे विविध प्रस्ताव कार्यालयात धूळ खात पडले आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी कार्यालयाकडे विचारणा केली असता, या प्रस्तावाला निधी उपलब्ध नसल्याचे सोयीस्कर उत्तर दिले जाते. कृषी विभाग हा पांढरपेशी लोकांसाठी असून त्यांचा शेतकऱ्यांना फायदा होत नाही. मग कृषी विभाग कसला? असा प्रश्न सामान्य शेतकऱ्यांतून व्यक्त केला जात आहे. कडेगाव कृषी विभागाच्या कार्यालयात एकूण ५० पदे मंजूर असून त्यापैकी ३७ पदे भरलेली आहेत. बऱ्याच दिवसांपासून १४ पदे रिक्त असून त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. तालुक्यात एकूण २४ सजा असून त्यांची २ मंडले तयार करण्यात आली आहेत. त्यामध्ये अंबक, कडेगाव ही प्रमुख आहेत.कृषी विभागाच्या तालुका कृषी अधिकारी, मंडल कृषी अधिकारी दिलीप होलमुखे, अनिल फोंडे या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे व ठेकेदाराला हाताशी धरल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हे अधिकारी बऱ्याचदा कार्यालयात हजर नसतात. स्वत:च्या कामाकरिता ते परगावी गेलेले दिसून येतात. कार्यालयात चौकशी केली असता, संबंधित अधिकारी हे कार्यालयाच्या कामकाजासाठी बाहेर गेले आहेत, अशी खोटी माहिती मिळत आहे. मनमानी कारभाराला वैतागलेकृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला शेतकरी वैतागले असून याबाबत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून, शेतकऱ्यांसाठी सर्व योजनांचा लाभ मिळावा अशी सोय करावी तसेच तालुक्यातील झालेल्या बंधाऱ्यांची पाहणी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.
‘कडेगाव कृ षी’चा अनागोंदी कारभार
By admin | Updated: November 16, 2014 23:48 IST