शिराळा
: चांदोली पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व आदित्य ठाकरे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली असून, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे मार्च महिन्यात दौरा करणार आहेत, अशी माहिती आमदार मानसिंगराव नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आमदार नाईक म्हणाले की, या बैठकीत आराखडा तयार करून त्यास मंजुरी देण्यात येईल. तसेच या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. वारणावती येथील शासकीय विश्रामगृहाचा खासगी करणातून विकास करणे, येणाऱ्या पर्यटकांना सर्व सेवासुविधा देण्याबाबत आराखडा तयार झाला असून, त्यानुसार प्रक्रिया सुरू आहे. यावेळी सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. हे केंद्र विकसित झाले, तर येथील स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. चांदोली धरण, अभयारण्य, शिराळा येथील भुईकोट किल्ला आदींची पाहणी करण्यासाठी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे मार्च महिन्यात दौरा करणार आहेत.
मुंबई येथे बैठकीस जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आदिती तटकरे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, खासदार धैर्यशील माने, नगराध्यक्षा सुनीता निकम, पर्यटन विभागाचे मुख्य सचिव, अधिकारी उपस्थित होते.