सांगली/मिरज : शहरात नाताळचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. ख्रिस्ती बांधवांचे प्रार्थनास्थळ असलेल्या चर्चला आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. याप्रसंगी रेव्ह. बी. आर. तिवडे (बिशप आॅफ कोल्हापूर) यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रवचनाला ख्रिस्ती बांधव उपस्थित होते. सांगली-मिरज रस्त्यावरील चर्च आणि बालाजी चौकातील चर्च येथे नाताळनिमित्त सकाळपासून ख्रिस्ती बांधवांनी उपस्थिती दर्शविली होती. एकमेकांना ‘हॅपी ख्रिसमस’ अशा शुभेच्छा देत नाताळनिमित्त आयोजित प्रार्थना सभेत सर्वजण सहभागी झाले होते. यावेळी उपस्थितांना रेव्ह. बी. आर. तिवडे यांनी, जगाच्या सध्याच्या परिस्थितीत प्रभू येशूची शिकवण व आचरण अत्यंत आवश्यक आहे, त्याचा अंगीकार प्रत्येकाने केला पाहिजे. तसे झाले तरच जगात खऱ्याअर्थाने शांती नांदेल, असा संदेश दिला. बुधवारी रात्री मोजस चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. आज, गुरुवार, २५ रोजी सकाळी ९ वाजता ‘ख्रिसमस भक्ती विशेष’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. चर्चच्या आवारात येशू ख्रिस्ताच्या जन्माचा देखावा सादर करण्यात आला होता. तो पाहण्यासाठी बालगोपाळांसह नागरिकांनीही गर्दी केली होती. तेथे असलेला सांताक्लॉज चिमुकल्यांना खाऊचे वाटप करीत होता. कार्यक्रमांचे संयोजन शैलेंद्र सॅमसन, सुनील कांबळे, अशोक विधाते, इमॅन्युएल भोरे, सॅमसन तिवडे, राजू मोरे, जयश्री ससे, सुषमा ननदीकर, विजया तडाखे, सतीश कोल्हे, दिवाकर मोरे आदींनी केले आहे. नाताळनिमित्त शहरातील विविध चर्चमध्ये सकाळी विशेष प्रार्थना सभा व विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. नाताळनिमित्त मिरज ख्रिश्चन चर्च, रोझरी चर्च, अल्फोन्सा चर्च, सेंट पिटर तेलगू चर्चमध्ये ख्रिस्त धर्मगुरूंच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम झाले. काँग्रेस अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, समित कदम, गजेंद्र कुळ्ळोळी, नगरसेवक सुरेश आवटी, शिवाजी दर्वे, आनंदा देवमाने, पोलीस निरीक्षक शिवाजी आवटे, प्रभात हेटकाळे यांनी ख्रिश्चन बांधवांना शुभेच्छा दिल्या. नाताळनिमित्त इस्त्राईलनगर, कमान वेस, वॉन्लेसवाडी, बेथेलहेमनगर येथे ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या. धर्मगुरूंच्या उपस्थितीत उपासना सभा पार पडली. (प्रतिनिधी)मान्यवरांच्या शुभेच्छा !आज ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय भांगे, उपमहापौर प्रशांत मजलेकर आदी उपस्थित होते. मिरजेत चर्चमध्ये नाताळनिमित्त प्रार्थना व प्रभू येशू जन्माचा संदेश देण्यात आला.
सांगली, मिरजमध्ये नाताळ उत्साहात साजरा
By admin | Updated: December 26, 2014 00:13 IST