सांगली : सांगली विधानसभा मतदारसंघातील उमेदवार म्हणून मदन पाटील यांच्या नावावर शनिवारी पालकमंत्री पतंगराव कदम, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांनी शिक्कामोर्तब केले. महापालिकेतील आढावा बैठकीच्या निमित्ताने त्यांनी नगरसेवकांना निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे आवाहनही केले. महापालिकेतील कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत विधानसभेच्या तयारीबाबतही चर्चा झाली. पतंगराव कदम म्हणाले की, महापालिकेला विकासकामे करण्यासाठी आता तीन महिनेच शिल्लक आहेत. विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी महत्त्वाची कामे मार्गी लावली पाहिजेत. सांगली व मिरजेची जागा आपणास निवडून आणली पाहिजे. सांगलीतील आपला उमेदवार ठरलेला आहे. तो कोण, हे सांगण्याची गरज नाही, सर्वांना तो माहीत आहे. बाकीच्या विधानसभा मतदारसंघात लोकांशी चर्चा करून नावांची यादी तयार करण्यात येईल. त्यानंतर उमेदवारीचा निर्णय घेतला जाईल. मिरजेसाठी सक्षम उमेदवार आपणास द्यावा लागेल. मिरजेतील ज्येष्ठ नगरसेवकांनी याबाबत चर्चा करून उमेदवारीबाबत नाव सुचवावे, असे त्यांनी सांगितले. सांगली व मिरजेतील जागा कोणत्याही परिस्थितीत निवडून आली पाहिजे. त्यासाठी नगरसेवक व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी विश्वजित कदम म्हणाले की, सांगलीत मदन पाटीलच उमेदवार असतील. त्यामुळे नगरसेवकांनी आता तयारीला लागावे. महापालिकेत ज्या पद्धतीने लोकांनी आपल्यावर विश्वास व्यक्त केला, त्याच पद्धतीने विधानसभेलाही ते विश्वास व्यक्त करतील. त्यासाठी पदाधिकारी व नगरसेवकांनी गतीने कामे केली पाहिजेत. (प्रतिनिधी)
उमेदवारी पुन्हा मदनभाऊंनाच
By admin | Updated: June 22, 2014 00:28 IST