अशोक डोंबाळे ल्ल सांगलीअधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे सांगलीच्या मुख्य बसस्थानकातील उपाहारगृह सहा महिन्यांपासून बंद आहे. त्यातच चालक व वाहकांच्या विश्रांतीगृहातील स्वच्छता होत नसल्यामुळे तेथे ढेकणांचे साम्राज्य आहे. याचा फटका मात्र दमूनभागून आलेल्या चालक व वाहकांना बसत आहे.मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांचीगर्दी असते. मात्र प्रवाशांच्या सोयीसाठीचे आणि स्थानकाच्या उत्पन्नाचा स्रोत असलेले उपाहारगृह गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे एसटीला दोन लाखांचा तोटा झाल्याचे अधिकारी सांगतात. याबद्दल एसटीचे अधिकारी म्हणाले की, निविदांमध्ये तांत्रिक अडचणी असल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन मागविले आहे. येत्या आठवड्यात उत्तर मिळाल्यानंतर उपाहारगृह चालविण्यास देण्याबाबत निर्णय घेऊ.मार्गदर्शन मागविण्यासाठी अधिकाऱ्यांनी सहा महिने घालविले असतील त्यांच्या कामातील तत्परता दिसून येते! उपाहारगृह नसल्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या घेऊन आलेल्या चालक व वाहकांना जेवणाची बसस्थानकावर कोणतीही व्यवस्था नाही. बसस्थानकाच्या मागील बाजूस विश्रांती कक्ष आहे. पण, त्याची कधीच स्वच्छता केली जात नाही. येथे ढेकूण झाल्यामुळे चालक आणि वाहकांना झोपच लागत नसल्याच्या तक्रारी आहेत. ते पावसाळ्यात गळत असून तेथे पाणी साचून राहते. महिलांसाठी स्वतंत्र विश्रांती कक्ष बनविण्याची तरतूद आहे. मात्र येथे महिलांसाठी विश्रांतीगृहच नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा अभाव असल्यामुळे चालक आणि वाहकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. (उत्तरार्ध)
बसस्थानकातील उपाहारगृह सहा महिने बंद
By admin | Updated: July 4, 2014 00:47 IST