सचिन लाड - सांगली --बाहेरील जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांनी सांगलीत शिरकाव करून बँका लुटीसाठी बँकांतील ग्राहकांना ‘टार्गेट’ केले आहे. बँकेतून पैसे काढून बाहेर येणाऱ्या नागरिकांना लुबाडण्याचा उद्योग या टोळीने सुरू केला आहे. अवघ्या दोन ते तीन मिनिटात लाखोंच्या घरात हात मारून चोरटे पसार होत आहेत. यामुळे आता नागरिकांनीच बँकेतून पैसे काढल्यानंतर सावधानता बाळगायला हवी.शहरात आतापर्यंत झालेल्या लुटीच्या घटना उघडकीस आणण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्षम आहे. मात्र अलीकडे गुन्हेगारांच्या चोरी करण्याच्या पद्धतीत बदल झाला आहे. हे गुन्हेगार पंचवीस ते तीस वयोगटातील आहेत. त्यांना शोधून रेकॉर्डवर आणणे आव्हान बनले आहे. यासाठी पोलिसांनी अनेकदा विशेषत: जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी बँकांना आत व बँकेबाहेरही सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची सूचना केली होती. परंतु या सूचनेचे पालन केले जात नाही. परिणामी बँकेबाहेर लुटीची घटना घडली, तर चोरट्यांचा शोध घेण्यात कोणतीच मदत होत नाही. यामुळे ज्याला लुटले आहे, त्याचीच तपासात मदत घेतली जाते. नागरिक लाखो रुपयांची रोकड बॅगेत ठेवतात. ही बॅग त्यांच्या हातात असते. ती लांबविण्यास चोरट्यांना फारशी मेहनत घ्यावी लागत नाही.पाच जणांची टोळी असण्याची शक्यताबँकेत नेहमीच गर्दी असते. या गर्दीत चोरटे आहेत की नाहीत, हे समजू शकत नाही. एखाद्याच्या रकमेवर हात मारण्यासाठी किमान चार ते पाच जण बँक परिसरात घुटमळतात. यामध्ये ग्राहकाच्या मागावर एक, बाहेर दोघेजण वाहन घेऊन उभे असतात, तर चौथा हातातील बॅग पळविण्यासाठी सज्ज असतो. गेल्या पंधरा दिवसात शहरात बँकेतून बाहेर पडलेल्या तिघांना लुटल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये १३ लाखांची रोकड चोरट्यांच्या हाती लागली आहे.रक्कम काढल्यानंतर नागरिकांनी काय काळजी घ्यावी, याची सूचना देणारे फलक लावण्यासाठी बँकांना आवाहन केले आहे. बँकेच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याची सूचना केली आहे. चोरट्यांना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.- दिलीप सावंत, जिल्हा पोलीसप्रमुख नागरिकांनी काय काळजी घ्यावी!मोठी रक्कम काढल्यानंतर ती बॅगेत ठेवून बॅग गळ्यात अडकवावी.रक्कम काढल्यानंतर ती बॅग दुचाकीला अडकवून किंवा मोटारीच्या सीटवर ठेवू नये. आपल्यावर कोण ‘वॉच’ ठेवतो आहे का, हे पाहावे. संशय आल्यास सतर्क रहावे.मोठी रक्कम काढायला जाताना सोबत विश्वासू व्यक्तीला घेऊन जावे.
गुन्हेगारांच्या टोळ्यांकडून बँकांमधील ग्राहक टार्गेट!
By admin | Updated: November 22, 2014 00:01 IST