लोकमत न्यूज नेटवर्क
कोकरुड : ‘कुस्ती हेच जीवन’च्या माध्यमातून कुस्तीचा प्रचार व प्रसार केल्याबद्दल पत्रकार पहिलवान मनोज मस्के यांना दत्तसेवा उद्योग समूहाकडून ‘आदर्श कुस्ती भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संघटनेच्या वतीने अनेकांना पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आले.
प. मनोज मस्के लेखणीतून कुस्ती वाढविण्याचे काम करीत असून सध्या ‘कुस्ती हेच जीवन’चे शिराळा तालुकाध्यक्ष आहेत. पहिलवान पांडुरंग पाटील (कोतोली) यांनीसुद्धा शाहूवाडी तालुक्यातील बंद पडलेली कुस्ती मैदाने पुन्हा चालू करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल त्यांनाही ‘आदर्श कुस्ती भूषण’ पुरस्कार देण्यात आला. हे पुरस्कार शाहूवाडी तालुक्यातील सरूडचे पी. आर. पाटील, दत्त सेवा उद्योग समूहाचे संस्थापक आनंदराव माईंगडे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी राष्ट्रकुल विजेते प. राम सारंग, कोल्हापूर जि. प. बांधकाम सभापती सर्जेराव पाटील, जि. प. सदस्य हंबीरराव पाटील, ‘कुस्ती हेच जीवन’चे संस्थापक रामदास देसाई, सांगली जिल्हा संपर्कप्रमुख शरद पाटील, शाहूवाडी तालुकाध्यक्ष अशोक सावंत, संपत पाटील उपस्थित होते. तुरुकवाडी येथे शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन हा गौरव करण्यात आला.