सांगली : शासनाच्या आदेशानुसार व ग्रामपंचायतींच्या ना हरकतीनुसार जिल्ह्यात पहिल्याच दिवशी २० शाळा सुरू झाल्या. आठवी ते बारावीचे वर्ग भरले.
संबंधित गावांतील कोरोनाची स्थिती पाहून १५ जुलैपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यासाठी काही बंधनेही घातली होती. शिक्षकांची आरटी-पीसीआर चाचणी, गावात नवे रुग्ण नसणे, अशा अटी घातल्या होत्या. ग्रामपंचायत व पालकांची ना हरकत पत्रेदेखील सक्तीची होती. या अटींची पूर्तता करत गुरुवारी (दि.१५) वीस शाळांची घंटा वाजली. आठवी ते बारावीदरम्यान एकूण विद्यार्थी संख्या १ लाख ४९ हजार २० इतकी आहे. २० शाळांत पहिल्या दिवशी १ हजार ५८९ शाळांनी हजेरी लावली. उर्वरित शाळादेखील टप्प्याटप्प्याने सुरू होण्याची अपेक्षा आहे.
आज सुरू झालेल्या शाळांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र बेंचवर सोशल डिस्टन्स राखून बसवण्यात आले. मास्क सक्तीचा होता. शिक्षकांचीही चाचणी करून व मास्कसह परवानगी देण्यात आली होती. विद्यार्थ्यांना मैदानावर खेळण्यास निर्बंध घालण्यात आले.
चौकट
तालुकानिहाय सुरू झालेल्या शाळा अशा...
तासगाव ३, खानापूर ६, कवठेमहांकाळ ६, जत ५. महापालिका क्षेत्रात एकही शाळा सुरू झाली नाही. रुग्णसंख्या जास्त असलेल्या वाळवा, मिरज, कडेगाव या तालुक्यांतही शाळा बंंदच राहिल्या. जिल्हाभरात एकूण ८८८ शाळा बंद राहिल्या.