शिराळा नगरपंचायत कार्यालयाकडून दुकानदारावर मुख्याधिकारी योगेश पाटील व कर्मचाऱ्यांनी कारवाई केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत नगरपंचायतकडून नियमभंग करणाऱ्यांवर ८ व्यापारी दुकानदार, तसेच ४ फळ व भाजीपाला विक्रेत्यांवर बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
नगरपंचायत कार्यालयाकडून कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत प्राप्त आदेशानुसार शहरात संचारबंदी, तसेच जमावबंदी लागू करण्यात आली असून, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना पूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. संबंधित आदेशाचे काटेकोर अंमलबजावणी होण्याच्या अनुषंगाने दिवसा व रात्रीच्या पाहणी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.
मुख्याधिकारी योगेश पाटील, नगरपंचायतचे अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश असलेल्या या पाहणी पथकाद्वारे शहरातील सर्व आस्थापनांची पाहणी, तसेच अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या दुकानांची पाहणी दिवसा आणि रात्रीही करण्यात येते व नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. या पाहणी पथकाद्वारे ८ व्यापारी दुकानदार, तसेच ४ फळ व भाजीपाला विक्रेत्यांवर बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.