मिरज : मिरजेत एका राजकीय पक्षाच्या शहाराध्यक्षाने गैरवर्तन केल्याची तक्रार विधानसभेसाठी इच्छुक महिला उमेदवाराने पोलिसात केली. संबंधित शहराध्यक्षाला पोलीस ठाण्यात पाचारण केल्यानंतर त्याची भंबेरी उडाली. महिला कार्यकर्त्यांची माफी मागून प्रकरण पोलीस ठाण्यात मिटविण्यात आले. विधानसभेसाठी इच्छुक असलेली महिला कार्यकर्ती एका राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी झाली असताना शहाराध्यक्षाने सर्वांसमोर अश्लील शिवीगाळ करून गैरवर्तन केल्याची तक्रार आहे. याबाबत महिलेने पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे व पोलिसांत तक्रार केली. महिलेशी गैरवर्तनाबाबत शहराध्यक्षाला पोलीस ठाण्यात पाचारण करण्यात आल्यानंतर पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विरोधक पोलीस ठाण्यात जमा झाले. महिला कार्यकर्तीने पोलिसांसमोर शहराध्यक्षाची चांगली हजेरी घेतली. महिलेने गुन्हा दाखल करण्याचा पवित्रा घेतल्याने शहाराध्यक्ष हवालदिल झाला. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने गैरवर्तनाबाबत शहराध्यक्षाने माफीनामा लिहून दिल्यानंतर प्रकरण मिटविण्यात आले. (वार्ताहर)
शहराध्यक्षाचे महिलेशी गैरवर्तन
By admin | Updated: September 23, 2014 23:58 IST