लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : काेरोनाच्या चिंतेचा जिवाणू मेल्याने कोरोना विषाणूपासून संरक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या सॅनिटायझरची विक्री ९० टक्के घटल्याचे दिसून आले. अँटिसेफ्टिक लिक्विडच्या विक्रीचा आलेखही जवळपास ७० टक्क्यांनी खाली आला आहे. यावरुन लोकांमधील निश्चिंतपणा दिसून येत आहे.
सांगली जिल्ह्यात मार्च ते ऑगस्ट २०२० या पाच महिन्यात जिल्ह्यात ३ कोटी रुपयांच्या सॅनिटायझरची विक्री नोंदली गेली होती. औषध दुकाने, जनरल स्टोअर्स, किराणा मालाच्या दुकानांपासून अगदी पानाच्या टपरीवरही सॅनिटायझरची विक्री केली जात आहे. मार्च २०२० मध्ये केवळ पाच ते सहा कंझ्युमर कंपन्यांचेच सॅनिटायझर उपलब्ध होते. त्यानंतर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनीही मोठ्या प्रमाणावर सॅनिटायझरची विक्री केली. कारखाने व जिल्ह्यातील विविध संस्थांनी या काळात ७ लाख लिटरहून अधिक सॅनिटायझरची निर्मिती केली. मार्चमध्ये सॅनिटायझरचा तुटवडा होता. आता सॅनिटायझरचा मोठ्या प्रमाणावर साठा शिल्लक आहे. त्याच्या विक्रीत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे.
चौकट
अँटीसेफ्टिक लिक्विडची विक्री ७० टक्क्यांनी घटली
जिल्ह्यात मार्च ते सप्टेंबर या काळात अँटीसेफ्टिक लिक्विडचा तुटवडा निर्माण झाला होता. मोजक्याच कंपन्यांच्या लिक्विडला मागणी होती. जानेवारी ते मार्च २०२० या काळात याच्या विक्रीत ७० टक्के घट झाल्याची माहिती औषध विक्रेत्यांनी दिली.
चौकट
जिल्ह्यात २२०० किरकोळ व होलसेल औषध विक्रेते आहेत. त्यांच्याकडील विक्री ९० टक्के घटली आहे. जनरल स्टोअर्समधूनही सॅनिटायझरचा साठा शिल्लक आहे. मार्च ते ऑगस्ट २०२० या काळात महिन्याकाठी ४५ ते ५० लाख रुपयांच्या सॅनिटायझरची विक्री जिल्ह्यात होत होती. आता महिन्याकाठी ५ लाख रुपयांचे सॅनिटायझरही विकले जात नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
कोट
जिल्ह्यात मागील वर्षीच्या तुलनेत १० टक्केही सॅनिटायझर विक्री होत नाही. मागणीत मोठी घट झाली आहे. तीच परिस्थिती मास्क व अँटीसेफ्टिक लिक्विडची आहे. औषध दुकानांमधील मास्क पूर्वी लोक घेत होते. आता ते कापडी मास्क वापरत आहेत. त्यातही ९५ टक्के घट आहे.
-विशाल दुर्गाडे, अध्यक्ष, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, सांगली