लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : गेल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व आलेल्या महापुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहेत. यात सर्वाधिक नुकसान शेतीचे झाले असून, त्यानंतर इमारती, महावितरण, रस्ते, पाणीपुरवठा योजनांना हानी पोहोचली आहे. प्रशासनाने तयार केलेल्या प्राथमिक अहवालानुसार, सुमारे ६०० कोटींहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज असून, पुराचे पाणी ओसरल्यानंतर पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीचा आकडा वाढण्याचीच शक्यता आहे.
महापुराची कोणतीही शक्यता नसताना, गेल्या आठवड्यात जिल्ह्यात अतिवृष्टी झाली; शिवाय पाणलोट क्षेत्रातील विक्रमी पावसामुळे महापूरही आला. सध्या पाणी नदीपात्रात जात असून, हळूहळू परिस्थिती सुरळीत होत असली तरी, २०१९ पाठाेपाठ यावर्षीही पुन्हा एकदा महापुराचा फटका सहन करावा लागला आहे. यंदा १०३ गावांतील ४१ हजार ८४ कुटुंबांना महापुराचा फटका सहन करावा लागला. यात सर्वाधिक नुकसान शेतीचे झाले असून, त्यात ४२ हजार हेक्टरवरील क्षेत्राला नुकसान पोेहोचले आहे.
जिल्ह्यातील अनेक गावे व शहरांच्या पाणी योजना नदीवर अवलंबून आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील १३२ पाणी योजनांना याचा फटका बसला. या योजनांच्या दुरुस्तीसाठी आता २ कोटी ७ लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. महापालिका क्षेत्रातील इमारतींची पडझड, पाणीपुरवठा यंत्रणांच्या दुरुस्तीसाठी १५० कोटींची आवश्यकता आहे.
शेतीपाठोपाठ सर्वाधिक नुकसान रस्ते, पूल व महावितरणचे झाले आहे. त्यात रस्ते, पुलांच्या दुरुस्तीसाठी ४६६ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी लागणार असून, महावितरणचे ३४ कोटी ४९ लाखांचे नुकसान झाले आहे. शिवाय महापूर कालावधीत यंत्रणा सक्षम ठेवण्यासाठी २८ कोटी ७० लाखांच्या निधीची मागणी प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
महापुराचे पाणी ओसरू लागले असले तरी, अद्यापही स्वच्छतेची कामे सुरूच आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांना वेळ लागणार आहे. प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार सध्या ६०० कोटींच्या नुकसानीचा अंदाज वर्तविण्यात आला असला तरी, अंतिम पंचनाम्यानंतर नुकसानीचा आकडा वाढून एक हजार कोटींवर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
चौकट
दोन दिवसातील महापुरात पशुधनाचेही मोठे नुकसान झाले असून, त्यात १८ पशुपालकांची १६ जनावरे, तर १९ हजार ३६० कोंबड्या मृत झाल्या आहेत. पशुधनासह जनावरांच्या गोठ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. शेतीसह जनावरे, गोठा नुकसानीमुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
कोट
जिल्ह्यात पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्राथमिक अहवालानुसार झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी मागणी केली आहे.
- डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी