डॉ. संजय साळुंखे दहा महिन्यांच्या मणिकर्णिकेसोबत
डॉ. संजय साळुंखे - ऑनड्युटी ४२५ दिवस
आरोग्य विभागाला गेल्या किमान ५० वर्षांत सर्वाधिक ताण देणारी म्हणून २०२० आणि २०२१ ही दोन वर्षे स्मरणात राहतील. या विभागाचा मुख्य खांब म्हणून सर्वाधिक जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्यावर आहे. गेल्यावर्षी २२ मार्चला पहिला कोरोना रुग्ण सापडल्यापासून आजपर्यंतच्या ४२५ दिवसांत एकही दिवस सुटी न घेता त्यांचा कोरोनाशी लढा सुरू आहे.
सकाळपासून वाजणारा मोबाईल मध्यरात्रीपर्यंत थांबत नाही. अखंड चालणाऱ्या व्हिडिओ कॉन्फरन्स, सतत धडधडणारे मेल, बेड, अैाषधे, इंजेक्शनसाठी खणखणारा फोन, लागोपाठ बैठका, मंत्र्यांचे दौरे यामुळे कोरोनाचे सव्वा वर्ष अक्षरश: तिसरे महायुद्धच ठरले आहे. सेनापती रणांगणावर पाय रोवून उभारला तरच सैन्यदेखील डटके लढत राहते. याची पक्की जाण ठेवून डॉक्टर निर्धारपूर्वक लढत आहेत. मानसिकदृष्ट्या सदैव खंबीर राहिले आहेत. ही मन:शांती मिळवली अवघ्या दहा महिन्यांच्या मणिकर्णिकापासून. मणिकर्णिका म्हणजे डॉक्टरांची नात, मुलाची मुलगी. मुलगा बेळगावला व सून पुण्याला दोघेही वैद्यकीय उच्च शिक्षणासाठी गेलेले. त्यामुळे मणिकर्णिकेची जबाबदारी डॉक्टरांवरच. पण कोरोना काळात ती जबाबदारी न ठरता डॉक्टरांसाठी मानसोपचारतज्ज्ञच ठरली. घरी जाईपर्यंत डोळे टक्क उघडे ठेवून जागी असणारी मणिकर्णिका त्यांच्यासाठी ऊर्जेचा स्त्रोत आहे. तिच्या सान्निध्यात ताणतणाव गायब होतात. गेले सव्वा वर्ष मणिकर्णिका म्हणजे डॉक्टरांच्या मन:शांतीचे अैाषध ठरली आहे.
डॉक्टरकीचे शिक्षण घेत असल्यापासूनच त्यांना लिखाणाचा नाद. कोरोना काळात त्याला धुमारे फुटले. दिसामाजी एक-दोन पाने लिहितातच. मनातल्या भावभावनांच्या निचऱ्यासाठी लिखाणासारखा मार्ग नाही, हा त्यांचा विश्वास आहे. अर्थात, लिखाणामध्ये प्रशासकीय कामकाजाचा भाग नसतो. ललित स्वरुपाचे लिखाण जीवनानुभव सांगते. अलंकार, उपमा, हितोपदेश आणि रंजकतेने भरलेले लिखाण वाचनीय असल्याचे कौतुक मित्रमंडळी तसेच प्रशासकीय सहकारी करतात.
कोरोनाला खंबीरपणे भिडताना नात्यातील प्रेमभावना आणि लेखनातून व्यक्त होण्याची सवय कामी आल्याचे डॉक्टर सांगतात. रणांगणातून पळ काढण्याची सवय नसलेले डॉक्टर याच ऊर्जेवर कोरोनाशीही दोन हात करताहेत.