लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कच्च्या मालाचा तुटवडा, आयातीचा वाढत असलेला खर्च व इंधन दरवाढीमुळे खाद्यतेलाचे भारतातील दर पुन्हा भडकले आहेत. दरात तब्बल २५ टक्के वाढ झाली असून, येत्या महिन्याभरात यात आणखी मोठी वाढ होण्याचा व्यावसायिकांचा अंदाज आहे.
भारत हा खाद्यतेलाचा जगातील आघाडीचा खरेदीदार आहे. देशातील एकूण खाद्यतेलात ७० टक्के खाद्यतेल हे आयात केलेले असते. ऑक्टोबर २०१९ ते सप्टेंबर २०२० या काळात भारताने एकूण १ कोटी ३२ लाख ८२ हजार ४२७ टन खाद्यतेल आयात केले होते. त्यात नव्या वर्षात आणखी भर पडली आहे. आयात वाढत असताना पिकांच्या नुकसानीमुळे खाद्यतेलाचा तुटवडाही वाढत आहे. सध्या देशांतर्गत बाजारात मागणीच्या तुलनेत सूर्यफूल तेलाच्या पुरवठ्यात ८० टक्के तूट आहे. देशातील सोयाबीनच्या उत्पादनात १८ टक्के घट झाली आहे. मलेशिया व इंडोनेशिया येथील पामच्या उत्पादनातही घट झाली आहे.
खाद्यतेलाचे दर नियंत्रणात आणण्यासाठी भारताने आयात शुल्क १० टक्के कमी केले आहेत, तरीही त्याचा फारसा परिणाम दिसून आला नाही. मलेशिया या मोठ्या निर्यातदार देशाने खाद्यतेलावर ८ टक्के निर्यात कर लादला. इंडोनेशिया या निर्यातदार देशानेही ३ डॉलरवरून ३३ डाॅलरपर्यंत निर्यात शुल्क वाढविले. अर्जेंटिनाने २५ टक्क्यांवरून निर्यात शुल्क ३० टक्के केले. त्यामुळे दरांवर परिणाम झाला आहे. चीनकडून गेल्या काही महिन्यांत खाद्यतेलाची मोठी आवक होत असून, त्याचाही काहीअंशी दरावर परिणाम आहे.
चौकट
असे वाढले दर (रुपये प्रतिकिलो)
तेल जानेवारी २१ मार्च २१
सूर्यफूल १२० १६५
पाम १०२ १४०
सोयाबीन ११९ १४०
शेंगदाणा १५० १७०
सरकी १२० १४५
मोहरी ११९ १२०
कोट
खाद्यतेलाच्या दरात मार्चमध्ये मोठी वाढ झाली आहे. येत्या महिन्याभरात यात आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे सामान्यांच्या रोषास विक्रेत्यांना सामाेरे जावे लागत आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठ्यातील प्रचंड कमतरता व आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा हा परिणाम आहे.
- गजेंद्र कुल्लोळी, खाद्यतेल व्यापारी, मिरज