आटपाडी : आटपाडी शहरात गेल्या महिन्याभरापासून डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना, ग्रामपंचायतीच्या आरोग्य विभागाने या गंभीर प्रकाराकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. रुग्णांची संख्या २२ वर गेल्यावर आता त्यावर पंचायत समितीचा आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायतीकडून उपाययोजना सुरू केली आहे.आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून आटपाडीत तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली. त्यामध्ये डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांनी सांगलीत जाऊन उपचार घेतले. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना, कोणत्याच शासकीय यंत्रणेने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे रुग्णांमध्ये वाढ होत गेली. आता ग्रामपंचायत पदाधिकारी आणि आरोग्य विभागाने बैठक घेऊन उपाययोजना सुरू केली आहे.आज आटपाडीत एकाचवेळी आरोग्य विभागाच्या ५१ कर्मचाऱ्यांनी शहरात सर्वेक्षण केले. बाजार पटांगणाच्या पश्चिमेकडील विहीर, आड, ओढ्यातील मोठे आड, ओढ्यातील वडार समाजाच्या स्मशानभूमीजवळील आड, साठेनगर येथील जि. प. शाळेसमोरील आड, दत्त घाटावरील हौद, बाजार पटांगणातील हौद, खरात गल्ली येथील हौद, जि. प.च्या प्राथमिक शाळेसमोरील हौद, सार्वजनिक शौचालयाजवळील पाण्याचे ११ हौद, दत्त घाटावरील डबके, खादी ग्रामोद्योग भांडारच्या उत्तरेकडील ओढ्यातील डबके, भवानी इमारतीच्या उत्तरेकडील डबके, बर्फाच्या फॅक्टरीजवळील दिघंची रस्त्यावरील डबके, विठ्ठलनगर येथील खाण, आंबेबनाच्या पूर्वेकडील पावसाच्या पाण्याचे डबके, सिद्धनाथ थिएटरसमोरील कारखाना रस्त्यावरील गॅरेजजवळचे डबके, याशिवाय तुंबलेल्या गटारी साफ करण्याचे काम ग्रामपंचायतीच्यावतीने सुरू करण्यात आले. यावेळी सरपंच स्वाती सागर, उपसरपंच दिनकर देशमुख, ग्रामविकास अधिकारी उत्तम पाटील, कुमार चव्हाण, महेश देशमुख, सोनाली कुलकर्णी उपस्थित होते. (वार्ताहर)
आटपाडीत २२ जणांना डेंग्यूची लागण
By admin | Updated: September 11, 2014 23:07 IST