जत : तालुक्यातील बेळोंडगी परिसरात विनापरवाना दोन ठिकाणी सुमारे १४० ब्रास वाळूसाठा महसूल विभागाने जप्त करून त्याची तात्काळ लिलाव प्रक्रियेने विक्री केली. या विक्रीतून शासनाला एक लाख पन्नास हजार रुपये इतका महसूल मिळाला आहे. ही कारवाई आज (सोमवार) सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान करण्यात आली. बेळोंडगीत महसूल प्रशासनाने सलग दुसऱ्यांदा वाळूसाठा जप्त करून वाळू तस्करांवर कारवाई केली आहे. या कारवाईमुळे वाळू तस्करांत खळबळ माजली आहे.आज सायंकाळी तीन वाजण्याच्यादरम्यान अज्ञात व्यक्तीने फोन करून बेळोंडगी परिसरात बेकायदेशीर वाळूसाठा आहे, अशी माहिती तहसीलदार ज्ञानदेव कांबळे यांना दिली. त्यांनी तात्काळ यांची माहिती मंडल अधिकारी ताजुद्दीन मुल्ला व गाव कामगार तलाठी नितीन कुंभार यांना फोनद्वारे देऊन घटनास्थळी जाण्याचे आदेश दिले. दरम्यानच्या कालावधित गाव कामगार कोतवाल आर. वाय. धनगर व बापू सनदी तेथे गेले होते.मुल्ला व कुंभार यांनी बेळोंडगी ते उटगी रस्त्यादरम्यान पाहणी केली असता, त्यांना तेथे ७० ते ८० ब्रास वाळू साठा सापडला. याशिवाय बेळोंडगी गावालगत असलेल्या ओढा पात्राजवळ १३० ते १४० ब्रास वाळूसाठा त्यांना मिळाला. यासंदर्भात या परिसरातील गावात त्यांनी चौकशी केली असता, या वाळू साठ्याची माहिती कोणीही दिली नाही. त्यामुळे हा वाळूसाठा जप्त करून त्याची लिलाव प्रक्रियेत विक्री करण्यात यावी, अशी सूचना प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड व तहसीलदार ज्ञानदेव कांबळे यांनी मुल्ला व कुंभार यांना दिली. त्यांनी या परिसरातील वाळू व्यावसायिकांना याची माहिती दिली असता, जप्त वाळूसाठा लिलाव प्रक्रियेत त्यांनी सायंकाळी विकत घेतला. ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. (वार्ताहर)निनावी दूरध्वनीचा त्रासजत तालुक्यात वाळूतस्करांच्या विरोधात महसूल प्रशासनाने धडक मोहीम सुरू केली आहे. निनावी दूरध्वनी अथवा गोपनीय माहितीद्वारे वाळू तस्करांवर तात्काळ कारवाई केली जात आहे. परंतु अनेकदा चुकीचे निनावी दूरध्वनी महसूल विभागाकडे जातात. त्यातून प्रशासनाला मोठा त्रास होत असल्याचे तहसीलदार ज्ञानदेव कांबळे यांनी सांगितले.
बेळोंडगीत १४० ब्रास वाळूसाठा जप्त
By admin | Updated: February 2, 2015 23:52 IST