Krutant Marathi Movie Review : वळणावरील निरस गूढ कथा

By तेजल गावडे | Published: January 17, 2019 06:09 PM2019-01-17T18:09:13+5:302023-08-08T19:28:38+5:30

'कृतांत' चित्रपटात संदिप कुलकणी, सुयोग गोऱ्हे, विद्या करंजीकर, सायली पाटील हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

Krutant Marathi Movie Review | Krutant Marathi Movie Review : वळणावरील निरस गूढ कथा

Krutant Marathi Movie Review : वळणावरील निरस गूढ कथा

Release Date: January 18,2019Language: मराठी
Cast: संदिप कुलकणी, सुयोग गोऱ्हे, विद्या करंजीकर, सायली पाटील, फैज
Producer: मिहीर शाहDirector: दत्ता भंडारे
Duration: १ तास ५६ मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

- तेजल गावडे

आजकालच्या धावपळी व स्पर्धात्मक युगात प्रेम, जिव्हाळा व आपुलकीचा अभाव आपल्याला पाहायला मिळतो. या धावपळीत माणूस जगणंच विसरून गेला आहे. आपल्या आजूबाजूच्या माणसांचा व नात्यांचा त्याला विसर पडू लागला आहे. इतकेच नाही तर कामाच्या व्यापात त्यांच्यासोबत व्यतित केलेल्या क्षणांचादेखील विसर पडला आहे. या धावपळीच्या युगात कुठेतरी स्वतःसाठी व आपल्या जवळच्या व्यक्तींसाठी वेळ काढला पाहिजे. कारण आयुष्याच्या टप्प्यावर पुढे नियतीने काय वाढून ठेवले आहे, हे कोणालाच माहित नसते, हेच सांगण्याचा प्रयत्न 'कृतांत' चित्रपटातून करण्यात आला आहे.

'कृतांत' चित्रपटात सम्यक (सुयोग गोऱ्हे) हा कॉर्पोरेट जगात इतका गुरफटलेला असतो की त्याच्याकडे त्याची पत्नी (सायली पाटील), आई (विद्या करंजीकर) व मुलीसाठीदेखील वेळ नसतो. त्याची आई गावाला जाण्यासाठी त्याच्या मागे तगादा लावत असते आणि तो तिला टाळाटाळ करत असतो. मात्र एकेदिवशी त्याचा मित्र विकी (फैज) त्याच्या गावी जाण्यासाठी त्याला आग्रह करतो आणि कालांतराने तयारही होतो. त्याचे मित्र एक दिवस आधी निघतात व सम्यक दुसऱ्या दिवशी त्याच्या गावी जाण्यासाठी निघतो. या प्रवासादरम्यान त्याला एक व्यक्ती (संदीप कुलकर्णी) भेटतो. जो त्याला एका गूढ गोष्टीच्या माध्यमातून आयुष्यात संयम ठेवला पाहिजे नाहीतर कोणताही बिकट प्रसंग ओढावू शकतो, हे सांगू पाहतो. या गूढ गोष्टींतून सम्यकला शिकवण मिळते की नाही, हे चित्रपट पाहिल्यानंतर समजेल. 

'कृतांत' चित्रपटाचा आशय खूप चांगला असला तरी दिग्दर्शकाला तो नीट मांडता आलेला नाही. चित्रपटाची मांडणी काही ठिकाणी विस्कटलेली जाणवते. चित्रपटाचा पूर्वाध खूप कंटाळवाणा असून लेक्चरबाजी वाटतो. तत्वज्ञान सोडले तर गूढ गोष्टीला सुरूवात होताच पुन्हा चित्रपट उत्कंठा वाढवितो. सम्यकला शिकवण देणाऱ्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व नीट उलगडत नाही आणि तो जगाला फुकट तत्वज्ञान का देतोय, हे सिनेमा पाहताना खटकते. चित्रपटातील संगीत व बॅकग्राऊंड स्कोअर फारसे भावत नाही. या चित्रपटात संदीप कुलकर्णी एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आला असून त्याने ही भूमिका चांगली बजावली आहे. तर सुयोग गोऱ्हे, सायली पाटील, विद्या करंजीकर व फैज या कलाकारांनी चांगला अभिनय केला आहे. या चित्रपटात कलाकारांचा अभिनय ही जमेची बाजू आहे. साध्या सरळ कथेला सस्पेन्सचा तडका देऊन सिनेमा उत्कंठावर्धक करण्याचा प्रयत्न सपशेल फोल ठरला आहे. तुमच्यात संयम असेल तर 'कृतांत' पाहण्याचे धाडस नक्की करा. 
 

Web Title: Krutant Marathi Movie Review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.