प्रेमानं दोघांवर अक्षरश: गारुड केलेलं असतं. दोघांचं एकमेकांवर जिवापाड प्रेम असतं, पण घरच्यांपुढे गाडी अडलेली असते.आणि बघता बघता एक दिवस जोडी नौ दो ग्यारह होते...मग दोघांच्या घरचे शोधाशोध सुरू करतात. कॉलेज, नातेवाईक, मित्रमैत्रिणी अशा ठिकाणी शोधाशोध सुरू झाली, की साहजिकच पालक पोलीस स्टेशनला जातात आणि फिर्याद कसली नोंदवतात, तर माझ्या मुलीला कोणीतरी/अमुक मुलानं पळवून नेलं.’आणि मग तपासाची दिशाच बदलते. इकडे लैला मजनूची परिस्थिती अशी असते की पळून जातील कुठे? खिशातले पैसे फार दिवस पुरत नाहीत आणि कुठेतरी दोघं सापडतात. मग खरी कसोटीची वेळ येते. कारण तिथून पुढे कायद्याचं राज्य सुरू होतं. त्याचा पळून जाताना मुलामुलींनी विचारच केलेला नसतो.कायद्याचा अभ्यास हवाच१. मुलावर फिर्याद होते किड्नॅपिंगची, जर का मुलगी १८ वर्षांच्या वर असेल तर परिस्थिती जरा तरी सोपी असते. कारण ती कायद्यानं सज्ञान असते. दोघांनी जर रीतसर लग्न केलं असेल, तर ते कायद्याला मान्य असतं. पण जर का मुलगी १६ वर्षांपेक्षा मोठी आणि १८ वर्षांपेक्षा लहान असेल, तर? तर कायद्याच्या दृष्टीनं ते लग्न अवैध असतं. खरं म्हणजे ते लग्नच नसतं.२. अशा वेळी त्या मुलीच्या खंबीरपणावर सगळं अवलंबून असतं. जर का ती मुलगी ठामपणे असंच म्हणत राहिली, की ‘मी माझ्या मर्जीनं पळून गेले’ तर त्या मुलावरचा अपहरणाचा आरोप सिद्ध होत नाही. पण जर का ती मुलगी कुठल्या दबावाला बळी पडली, आणि असं काही म्हटली, की ‘यानं मला फूस लावली’ तर मात्र त्या मुलाची अवस्था फारच बिकट होते.३. वैद्यकीय तपासणीत त्या दोघांचे शरीरसंबंध आल्याचा निष्कर्ष निघाला, तर मात्र त्या मुलावर बलात्काराचाही आरोप होऊन केस कोर्टात गेली तर साक्षीपुराव्याने काय सिद्ध होईल हा भाग वेगळा. पण अशा प्रकारच्या आरोपांनी मनस्ताप व्हायचा तो होतोच. सगळा विषय अवलंबून असतो तो त्या मुलीच्या खंबीरपणावर, सद्सद्विवेकबुद्धीवर. तिनं जर हे मान्य केलं- ‘जे झालं ते माझ्या संमतीनं झाल’ तर तो मुलगा सुटू शकतो, नाहीतर त्याच्यावर बलात्काराचा खटला दाखल होऊ शकतो.४. अशा पळून जाऊन केलेल्या लग्नातली सगळ्यात गंभीर बाब म्हणजे मुलगी १६ वर्षांपेक्षा मोठी असणं. कारण अशा वेळी ती मुलगी इच्छेनं जरी पळून गेली असली तरी कायद्याच्या भाषेत त्याला अपहरण म्हणतात आणि शरीरसंबंधाला संमती असली, तरीही कायद्याच्या परिभाषेत त्याला बलात्कार म्हणतात.५. एवढा उद्योग करून, धोका पत्करून एकमेकांसाठी जीव पणाला लावूनही शेवटी कायदा म्हणतो, तुमचं लग्न हे लग्न नाही.६. त्यामुळे मुलगी १८ वर्षांची आणि मुलगा २१ वर्षांचा असल्याशिवाय या भानगडीत न पडणे हे उत्तम!
सज्ञान असलात, तरच लग्नाच्या भानगडीत पडा..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 12:55 IST
..नाहीतर किडनॅपिंग आणि प्रसंगी बलात्काराच्या आरोपालाही मुलांना सामोरं जावं लागू शकतं
सज्ञान असलात, तरच लग्नाच्या भानगडीत पडा..
ठळक मुद्देमुलगी १६ वर्षांपेक्षा मोठी, पण १८ वर्षांपेक्षा लहान असेल, तर कायद्याच्या दृष्टीनं ते लग्न अवैध ठरू शकतं.‘मी माझ्या मर्जीनं पळून गेले’ असं जर मुलीनं ठामपणे सांगितलं तरच मुलावरचा अपहरणाचा आरोप सिद्ध होत नाही.लग्न करताना मुलगा आणि मुलगी दोघांनीही सज्ञान असणंच आवश्यक.