रत्नागिरी : शासनातर्फे शाळाबाह्य मुलांसाठी राबवण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण, गुहागर तालुक्यांमधून सर्वाधिक शाळाबाह्य मुले सापडली आहेत. परराज्यातून येणाऱ्या कामगारांच्या मुलांची संख्या सर्वाधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. ३२८ शाळाबाह्य मुलांमध्ये १८६ मुलगे, तर १३२ मुलींचा समावेश आहे.या सर्वेक्षणासाठी राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत जिल्हाभरात ३२८ शाळाबाह्य मुले सापडली आहेत. शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्यभर विशेष मोहीम राबवण्यात आली. प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा, स्वयंसेविका यांच्यामार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातून दिवसभरात ३२८ विद्यार्थी शाळाबाह्य असल्याचे स्पष्ट झाले.यामध्ये कधीही शाळेत न गेलेल्यांमध्ये मुलांची संख्या ९० असून, ८९ मुली आहेत. मध्येच शाळा सोडलेल्यांमध्ये ९६ मुलगे व ५३ मुलींचा समावेश आहे.परराज्यातून रोजगारासाठी, व्यवसायासाठी येणाऱ्या कामगारांची संख्या जिल्ह्यामध्ये अधिक आहे. त्यामुळे रत्नागिरी कार्यालयात असलेल्या कामगारांच्या मुलांची नोंदणी परराज्यातील मूळ गावी करण्यात आल्याचे ठिकठिकाणी सांगण्यात आले. त्या राज्यातील शाळेत मुलांच्या शैक्षणिक प्रवेशासंदर्भात माहिती घेतल्यानंतर संबंधित मुलांबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.मंडणगड तालुक्यात ३७, दापोली ३०, खेड १६, गुहागर ८४, चिपळूण ४२, संगमेश्वर १९, रत्नागिरी ४६, लांजा ८, राजापूर १३, रत्नागिरी शहर १३ मिळून एकूण ३३८ शाळाबाह्य मुलांची नोंदणी करण्यात आली. या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा परिषद, नगरपरिषद शाळांमधून प्रवेश देण्यात येणार आहे. या आठवड्यापासूनच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देऊन बसवण्यात येणार आहे. यंदा प्रथमच अशी मोहीम हाती घेण्यात आली असून जिल्हाभरातील मोहीम यशश्वी होत असल्याची माहिती देण्यात येत आहे. सर्व्हेक्षणात जिल्ह्यातील चिपळूण, गुहागर, रत्नागिरी येथील शाळाबाह्य मुलांचे प्रमाण अधिक असल्याचे पुढे आले आहे. यामुळे या पुढे याबाबत कोणती कृती केली जाते याकडे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातून एका दिवसात ३२८ मुले शाळाबाह्य असल्याची माहिती मिळणे हे शिक्षण विभागासाठी, त्या पालकांसाठी आव्हानात्मक ठरूशकते. अशा परिस्थितीत अशा मुलांसाठी तातडीने हालचाली करण्याची गरज अनेकांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)प्रवाहात आणण्याचे प्रयत्न परराज्यातून विविध व्यवसायाच्या माध्यमातून कामगार कोकणात येत असतात. यावेळी त्यांच्या मुलांना शैक्षणिक प्रवाहात सामावून घेतले जात नाही. आता शाळाबाह्य मोहिमेंतर्गत अशा मुलांचा शोध घेतला जात असल्याने यापुढे शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नसल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे. जिल्हाभरात विशेष मोहीम राबविली जात असल्याने त्याचा फायदा सर्व स्तरावर होणार आहे. या मोहिमेत जवळजवळ सर्वच शिक्षक सहभागी झाले होते.
कामगारांची मुले शाळाबाह्य
By admin | Updated: July 7, 2015 23:06 IST