दापोली : २१व्या शतकात सर्व स्तरातील महिला पुढे येऊन कार्यक्षम बनल्या पाहिजेत. त्यासाठी सर्व महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होणे आवश्यक आहे. यासाठी कोणावरही विसंबून न राहता अगदी घरगुती साहित्यातून नाविन्यपूर्ण पदार्थ बनवून त्याचा व्यवसाय करणे सहज शक्य आहे, अशी माहिती डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर, दापोली येथील बी. एस्सी. ॲग्रीच्या राखी देवेंद्र खोत हिने दिली.
ग्रामीण उद्योजकता जागृती विकास कार्यक्रमांतर्गत ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रमात ती बाेलत हाेती. या कार्यक्रमामध्ये घरगुती साहित्याचा वापर करून पौष्टिक आणि चविष्ट असे ‘खजूर मोदक’ बनविण्याचे प्रात्यक्षिक राखीने करून दाखवले. त्याचे योग्य साहित्य, बनविण्याची सोपी पद्धत, विक्री करण्यासाठी नवनवीन कल्पना याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला अनेक महिलांनी तसेच शेतकऱ्यांनी उपस्थिती दर्शवली.
याचबरोबर खरीप हंगामात पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढत असताना कीटकनाशक औषधांची फवारणी शेतकरी करत आहेत. ही फवारणी करताना विषबाधा होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी, याचेही मार्गदर्शन केले. यामध्ये फवारणी करताना सेफ्टीकिटचा वापर कसा करावा, याचे प्रात्यक्षिक उपस्थित शेतकऱ्यांना दाखविण्यात आले. कीटकनाशके कुलूपबंद पेटीत ठेवावीत, कीटकनाशकांच्या बाटलीवरील माहितीपत्रक कसे वाचावे, त्याचा अर्थ काय याबद्दल शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. विषबाधा झाल्यास तत्काळ करावयाचे औषधोपचार समजावून सांगितले.
यावेळी शीला काेठारी यांनी सांगितले की, अतिशय सुंदर व मुद्देसूद माहिती महिलांना देण्यात आली. ग्रामीण भागातील महिलांसाठी निश्चितच याचा उपयोग होईल, असे त्या म्हणाल्या. गीता खाेत यांनी सांगितले की, खूपच छान माहिती मिळाली. घरच्या घरी पौष्टिक पदार्थ आपल्याला बनवता येतील. कोविड काळामध्ये महिलांना कार्यक्षम बनविण्याचा हा स्तुत्य उपक्रम आहे, असे खाेत यांनी सांगितले.