रत्नागिरी : सध्या भारनियमनाचे दिवस असल्याने इन्व्हर्टरचा खप चौपटीने वाढला आहे. रत्नागिरीबरोबरच सिंधुदुर्गातही इन्व्हर्टरला मागणी वाढली आहे. गेल्या एक-दोन वर्षात या दोन्ही जिल्ह्यातील भारनियमन कमी झाले असले तरीही उन्हाळी तापमानात प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याने त्याचा त्रास मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. त्यामुळे इन्व्हर्टरला पर्याय नसल्याने अगदी ग्रामीण भागातील घरांमध्येही इन्व्हर्टरचे प्रमाण वाढू लागले आहे. महावितरण कंपनीने सध्या फिडरनिहाय भारनियमन सुरू केले आहे. अ, ब, क, ड, ई अशा विविध फिडरमध्ये भारनियमन केले जात आहे. वीजचोरी, वीजगळती यानुसार फिडर गटाची रचना करण्यात आली असून, त्यानुसार भारनियमनाचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भारनियमनाचा फटका कमी बसला असला तरीही सरासरी तापमानात मोठी वाढ झाली आहे. दोन वर्षांपूर्वी उन्हाळ्यात सरासरी तापमान २७ डिग्री सेल्सिअस एवढे होते. आता ते सुमारे ३ ते ४ अंश सेल्सिअसने वाढले आहे. तापमानवाढीतील प्रत्येक अंश सेल्सिअस हा सहन न करण्यापलिकडे असल्याने वीजप्रवाह पाच मिनिटे जरी खंडित झाला तरीही उष्णतेने अंगाची काहिली होते. त्यामुळे पूर्वीपेक्षा आता भारनियमन कमी झाले तरी त्याचे परिणाम जास्त गंभीरपणे जाणवू लागले आहेत. भारनियमन आणि त्याचबरोबर वाढते तापमान यामुळे गेल्या काही वर्षांत इन्व्हर्टरचा खप वाढला असून, इर्न्व्हटरची गरज सर्वच वर्गातील लोकांना जाणवू लागली आहे. त्यामुळे वर्षभर इर्न्व्हटरला खप आहे. हिवाळ्यात इर्न्व्हटरच्या किंमत खाली येते. अशा समजुतीने काही लोक इर्न्व्हटरची खरेदी करतात, तर काहींना उन्हाळ्याचे चटके बसल्यावर ते खरेदी करतात असे दृश्य सर्रास पाहायला मिळते आहे. (प्रतिनिधी)
भारनियमन एकपट, इन्व्हर्टर चौपट
By admin | Updated: June 14, 2014 01:19 IST