सुभाष कदम -- चिपळूण -संगमेश्वर तालुक्यातील पाचांबे जखणीचे टेप येथील ग्रामस्थांची पाण्यासाठी आजही भटकंती सुरु आहे. या ग्रामस्थांच्या नशिबी आलेली ही वणवण कधी दूर होणार, याकडे ग्रामस्थांचे डोळे लागले आहेत. सन २००८ पासून या ग्रामस्थांना पाण्यासाठी हाल सोसावे लागत आहेत.जखणीचे टेप ही वाडी ज्या ठिकाणी विस्थापित करण्यात आली त्याठिकाणी पाण्याचे स्त्रोत कमी आहेत. तसेच स्वेच्छा पुनर्वसन असल्याने पाटबंधारे विभागाला विकासकामांसाठी निधी खर्च करण्यात अडचणी येत आहेत. स्वेच्छा पुनर्वसन गावठाणासाठी पुनर्वसन विभागाकडून अतिरिक्त खर्च करण्याला निर्बंध असतात. स्वेच्छा पुनर्वसन घेणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या जमीन व घरासह मोबदला दिला जातो. स्वेच्छा पुनर्वसन गावठाण विकासाचे दायित्व हे स्थानिक स्वराज्य संस्थाचे असते. पुनर्वसन गावठाणाला वीज, पाणी, रस्ता या सुविधा जिल्हा परिषदेने पुरविणे महत्त्वाचे असते. जखणीचे टेप येथे सुरुवातीपासूनच पाण्याची मोठी समस्या होती. संगमेश्वर तालुक्याचे तत्कालीन आमदार सुभाष बने यांच्या प्रयत्नातून या गावठाणात ८ लाखाची विहीर बांधण्यात आली होती. मात्र, या विहिरीतील पाण्याचा साठा हा मर्यादित असल्याने पाणीटंचाईची झळ बसू लागली. विशेष करुन उन्हाळी हंगामात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. याबाबत पंचायत समिती सदस्य संतोष थेराडे यांनी जखणीचे टेप येथे टँकर सुरु करावा, अशी मागणी पंचायत समितीच्या मासिक सभेत केली. त्यानंतर येथे हंगामी कालावधीसाठी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. परंतु, या गावठाणाला बारमाही पाणी पुरवठा करणारी एखादी नळपाणी योजना राबवावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. पाचांबे जखणीचे टेपमधील गायी, म्हैशी सांभाळणारे शेतकरी सध्या नायरी येथून विकत पाणी आणत आहेत. हे विकत आणलेले पाणी किती दिवस पुरवणार, या विवंचनेत येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी आहेत. पंचायत समितीकडून होळीनंतर सुरु होणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन टँकर सुरु करण्यात येतो. मात्र, टँकरमधून पुरवण्यात येणारे अपुरे पाणी घेण्यावरुनही ग्रामस्थांमध्ये मतभेद होतात. टँकरसह जंगलातल्या पाणवठ्याचा आधार घेत भटकंती करावी लागत आहे. ही भटकंती थांबवावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. स्वेच्छा पुनर्वसनात अतिरिक्त खर्च करण्याला निर्बंध आहेत.प्रकल्पग्रस्तांना जमीन व घरासह मोबदला दिला जातो.विकासाचे दायित्व स्थानिक स्वराज्य संस्थांकडे.उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.स्वेच्छा पुनवर्सनपाचांबे जखणीचे टेप ही वाडी पूर्वी धरणातील बुडीत क्षेत्रात होती. सन २००८ला या वाडीचे स्वेच्छा पुनर्वसन होऊन जखणीचे टेप येथे विस्थापित झाली.
पाण्यासाठी वणवण...
By admin | Updated: January 15, 2016 00:23 IST