लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील अत्यंत महत्त्वाचा चिपळूण बहादूरशेख येथील वाशिष्ठी पूल आता वाहतुकीसाठी सज्ज झाला आहे. पुलाच्या तांत्रिक चाचण्या घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. गणेशोत्सवापूर्वी पुलाचे लोकार्पण करण्याची तयारी करण्यात येत असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने पुलाचे लोकार्पण करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे आगमन नव्या पुलावरून होईल हे आता निश्चित झाले आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील वाशिष्ठी नदीवरील पुलाच्या कामाला प्रत्यक्षात ३ वर्षांपूर्वी सुरुवात करण्यात आली. काही अडचणीमुळे पहिल्या ठेकेदाराने काम सोडले. त्यामुळे चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या चेतक कंपनीकडे पुलाचे काम वर्ग करण्यात आले. चेतक कंपनीलाही अडचणी निर्माण झाल्याने सहयोगी ईगल इंफ्रा या ठेकेदार कंपनीकडे हे काम वर्ग करण्यात आले. कोरोना, लॉकडाऊन आणि कामगारांची कमतरता यामुळे कामाची गती काहीशी संथ होत असतानाच खासदार विनायक राऊत यांनी केंद्रापासून ते राज्यस्तरावर सर्व प्रयत्न करून सतत पाठपुरावा केला. त्यामुळे पुलाचे काम गेले वर्षभर दिवसरात्र सुरू राहिले आणि कामाला गती प्राप्त झाली.
एकूण २४७ मीटर इतक्या लांबीचा हा पूल आहे, तर १२-१२ मीटर रुंदीचे दोन पूल असून त्यापैकी एका पुलाचे काम आता परिपूर्ण झाले आहे. अंतिम टप्प्यातील काम देखील पूर्ण झाले असून, पुलाचे बहादूरशेख, तसेच कळंबस्ते या दोन्ही बाजूच्या जोड रस्त्याचे काम अखेरच्या टप्प्यात आले आहे. त्यामुळे पूल आता वाहतुकीसाठी सज्ज झाला आहे. आता अंतिम तांत्रिक चाचण्या घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत या चाचण्या पूर्ण केल्या जाणार आहेत. त्यामुळे पूल खुला होण्यास आता कोणतीच अडचण नसल्याचे सांगण्यात आले आहे.
--------
अथक प्रयत्नानंतर वाशिष्ठी पुलाचे काम पूर्ण झाले याचे समाधान आहे. गणेशभक्तांचे आगमन नवीन पुलावरून व्हावे यासाठी सलग प्रयत्न केले गेले. त्याला यश देखील मिळाले आहे. आता काही तांत्रिक चाचण्या घेतल्या जात आहेत. त्यामुळे लवकरच पुलाचे लोकार्पण करून गणेशोत्सवापूर्वी पूल वाहतुकीसाठी निश्चितपणे खुला करण्यात येईल, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.