लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनापासून वाचण्यासाठी किंवा कोरोनाचा त्रास कमी करण्यासाठी त्यातल्या त्यात प्रभावी उपाय म्हणून पाहिल्या जाणाऱ्या लसीकरणाला आता काहीशी गती येऊ लागली आहे. सुरुवातीपासून कासवगतीने होणाऱ्या लसीकरणाला आता चांगलाच वेग आला असून, ऑगस्ट महिन्यात दोन्ही डोसच्या सुमारे १ लाख मात्रा दिल्या गेल्या आहेत.
जानेवारीपासून सुरू झालेल्या लसीकरणाला आता खऱ्या अर्थाने गती आली असली तरी अजून जिल्ह्यात केवळ १६ टक्के लोकांचेच लसीकरण पूर्ण झाले आहे.
जानेवारीमध्ये पहिल्या टप्प्यात पहिल्या फळीतील कोरोना योद्ध्यांचे लसीकरण सुरू झाले. त्यानंतर दुसऱ्या फळीतील कोरोना योद्धे आणि ४५ वर्षांवरील लोकांचे लसीकरण सुरू झाले. अगदी मार्चअखेरपर्यंत लसीकरणाला गती आली नव्हती. लसीकरणाबाबत लोकांच्या मनात गैरसमजच अधिक होते. त्यामुळे ग्रामीण भागच नाही तर शहरी भागातही प्रतिसाद कमी होता. मात्र शिमग्यानंतर दुसऱ्या लाटेचा प्रभाव वाढू लागला आणि अचानक लोकांना लसीकरणाचे महत्त्व लक्षात आले. त्यामुळे एप्रिल महिन्यापासून लसीकरणासाठी सर्व केंद्रांवर रांगा दिसू लागल्या.
ज्यावेळी लोकांना लसीकरणाचे महत्त्व कळले, त्यावेळेपासून डोस कमी प्रमाणात उपलब्ध होऊ लागले. त्यामुळे लसीकरणाच्या कामात चांगलाच खंड पडू लागला. मे महिन्यात तर कोल्हापूर, सांगली, पुणे, मुंबईतील लोकही लसीकरणासाठी रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांवर येऊ लागले होते. मात्र डोसची उपलब्धता खूप कमी असल्याने अनेक ठिकाणी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. अनेक ठिकाणी त्यावरून वाद झाले.
ऑगस्ट महिन्यात मात्र डोस उपलब्ध होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे लसीकरणाने आता चांगला वेग घेतला आहे. ऑगस्ट महिन्यात रोज लस उपलब्ध होती. एका दिवशी सर्वाधिक २१ हजारांहून अधिक लसीकरण झाले. १ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात ३ लाख ८१ हजार २१४ लोकांनी पहिला तर १ लाख १२ हजार ५२१ लोकांनी दोन्ही डोस घेतले होते. ३१ ऑगस्ट रोजी पहिला डोस घेतलेल्यांची संख्या ४ लाख ९१ हजार ६३७ इतकी तर दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या २ लाख १० हजार ३४३ इतकी झाली आहे. पहिल्या मात्रेच्या संख्येत १ लाख १० हजार ४२३ तर दुसऱ्या मात्रेच्या संख्येत ९७ हजार ८२२ लोकांची भर पडली आहे.
सध्यातरी कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण हा चांगला पर्याय आहे. दोन्ही लस घेतलेल्यांना जरी कोरोना झाला तरी त्याची लक्षणे सौम्य असतात. दुसरी लाट प्रभावी झाल्यानंतर त्याचे महत्त्व लोकांना कळले आहे.