लाेकमत न्यूज नेटवर्क
राजापूर : अतिवृष्टीमुळे हानी झालेल्या राजापूर शहरातील मुख्य रस्त्यासह अन्य रस्त्यांच्या डागडुजीसाठी शासनस्तरावरून दोन कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती नगराध्यक्ष ॲड. जमीर खलिफे यांनी दिली आहे. राजापूर नगर परिषदेला हा निधी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी उपलब्ध करून दिला. हा निधी मिळण्यासाठी आमदार राजन साळवी व माजी आमदार ॲड. हुस्नबानू खलिफे यांनी पाठपुरावा केल्याचे नगराध्यक्ष खलिफे यांनी सांगितले.
राजापूर शहर आणि तालुक्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. अनेक रस्ते, पायवाटा, पूल वाहून गेले होते. राजापूर शहरातील मुख्य रस्ता तसेच शिवाजी पथ चिंचबांध वरची पेठ रस्ता व शहरातील अन्य भागांतील रस्त्याची अतिवृष्टीत हानी झाली. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालविणे जिकिरीचे बनले होते.
याकरिता नगराध्यक्ष ॲड. जमीर खलिफे यांनी रस्त्यांच्या डागडुजीसाठी प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करून निधीची मागणी केली होती. तर या निधीसाठी आमदार राजन साळवी व माजी आमदार ॲड. खलिफे यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळे नगरविकास खात्याकडून राजापूर शहरातील या रस्त्यांच्या डागडुजीसाठी आता दोन कोटी रुपये मंजूर झाले आहेत. लवकरच रस्त्यांचे डागडुजीचे काम हाती घेतले जाणार आहे. यामध्ये जवाहर चौक ते शिवाजी पथ रस्ता काँक्रीटीकरण केला जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष ॲड. खलिफे यांनी दिली.