चिपळूण : पावसाने पाठ फिरवल्याने भविष्यात पाण्याची टंचाई अधिक तीव्र होणार आहे. ही काळाची पावले ओळखून उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे यांनी पुढाकार घेऊन बंधारे बांधण्याची मोहीम सुरु केली. सर्वाधिक ३६६ बंधारे बांधून चिपळूण तालुक्याने आपला सहभाग प्रभावीपणे सिध्द केला. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी अभियानाच्या यशस्वीतेबद्दल चिपळूण तालुक्याचे कौतुक केले आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’, ‘पाणी वाचवा, तिसरे महायुध्द हे पाण्यासाठी होणार आहे’ अशी चर्चा सातत्याने सुरु आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी झपाट्याने खाली जात आहे. त्यातच बदलत्या हवामानाचा फटका बसत असल्यामुळे पाऊसही बेताचा पडत आहे. चालू हंगामात पाऊस उशीरा सुरु झाला आणि लवकर संपला. कोकणातील भातशेतीवर त्याचा परिणाम झाल्याने पीक हातचे गेले. परंतु, भविष्यात पिण्यासाठीही पाणी मिळणार नाही, याची जाणीव झाल्याने शासकीय यंत्रणा कामाला लागली. उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे, तहसीलदार वृषाली पाटील, गटविकास अधिकारी शुभांगी पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रकाश भोसले, उपविभागीय कृषी अधिकारी रघुनाथ सरतापे, तालुका कृषी अधिकारी रवींद्र पवार, पंचायत समिती कृषी अधिकारी सुनील खरात, विस्तार अधिकारी सुनील गावडे, प्रताप मोरे, विजय वानखेडे आदींची बैठक झाली. सरपंच, ग्रामसेवक, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक यांनाही यामध्ये सामावून घेण्यात आले. लोकसहभागातून बंधारे बांधण्याचे काम मिशन म्हणून सुरु करण्यात आले. उपविभागीय अधिकारी हजारे यांनी काही प्रगत संस्था, सहकारी बँका, कारखाने यांच्याकडून साडेचार टन प्लास्टिक कापड उपलब्ध करुन दिले. त्यातील अडीच टन कापड ग्रामपंचायतींना वाटप करण्यात आले. उर्वरित कापडही मागणीनुसार पुरवले जाणार आहे. हे कापड मोफत मिळाल्याने ग्रामपंचायतींनीही ग्रामस्थांना एकत्र करुन लोकसहभागातून श्रमदानाने हे बंधारे बांधले.आत्तापर्यंत तालुक्यात ३१० विजय बंधारे, २१ वनराई बंधारे, तर ३५ कच्चे बंधारे मिळून एकूण ३६६ बंधारे बांधण्यात आले आहेत. यामध्ये सरपंच, ग्रामसेवक व ग्रामस्थांचेही भरीव योगदान राहिले आहे. शनिवारी जिल्हा परिषदेत कृषी अधिकारी व कृषी विस्तार अधिकारी यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी बंधाऱ्यांचा आढावा घेतला. चिपळूण तालुक्यात सर्वाधिक बंधारे बांधण्यात आले असल्याने त्यांनी चिपळूण तालुक्याचे विशेष कौतुक केले. बंधारे बांधण्यात चिपळूण तालुका प्रथम क्रमांकावर आहे, अशी माहिती कृषी अधिकारी सुनील खरात यांनी दिली. अद्याप अनेक गावात बंधारे बांधण्याचे काम सुरु आहे. पाणी वाचविण्यासाठी बंधाऱ्यांच्या माध्यमातून ही चळवळ सुरु झाली असून, काही संस्था, व्यक्ती चळवळीत सहभागी झाल्या आहेत.(प्रतिनिधी)उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे यांनी औद्योगिक वसाहतीतील काही कारखान्यांबरोबरच जिल्हा मध्यवर्ती बँकेलाही प्लास्टिक कागदासाठी आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत संस्थांनी बंधाऱ्यांसाठी मोफत कागद पुरवला. त्यामुळे ग्रामपंचायतींना हे कापड उपलब्ध करुन देता आले. त्यामुळे हे मिशन यशस्वी होत असल्याचे कृषी अधिकारी सुनील खरात यांनी सांगितले.
पाणी अडवण्यामध्ये चिपळूण तालुका जिल्ह्यात अव्वल
By admin | Updated: November 5, 2015 00:10 IST