लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने शासनाने दहावीची बोर्डाची परीक्षा रद्द करून सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यावर्षी सर्व शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागणार आहे. मात्र, अकरावी परीक्षेसाठी वैकल्पिक सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा राज्य मंडळाच्या इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असल्याचे सूचित केले असले तरी अद्याप पालक, विद्यार्थ्यांमध्ये सीईटी परीक्षेबाबत संभ्रमावस्था आहे.
कोरोनामुळे सर्व व्यवस्था कोलमडलेली आहे. इंटरनेटअभावी अद्याप काही गावांमधून ऑनलाईन शिक्षण पोहोचलेले नाही. त्यामुळे सीईटी परीक्षा ऑनलाईन घेण्यापूर्वी निर्णयाचा फेर विचार करावा लागेल. कोरोना संकट काळात प्रत्यक्ष परीक्षा घेणे अशक्य असल्याने सरसकट पासचा निर्णय शासनाला घ्यावा लागला आहे. सीईटी परीक्षा देताना विद्यार्थ्यांची कसोटी लागणार आहे. त्याबाबत मुलांना योग्य मार्गदर्शन तसेच सराव चाचणी शाळास्तरावर घेणे गरजेचे आहे.
- विद्यार्थ्यांचे दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन ३० गुण, गृहपाठ / तोंडी / प्रात्यक्षिक परीक्षा यांच्या आधारे २० गुण तसेच नववीचा विषयनिहाय अंतिम निकाल ५० गुण याप्रमाणे गुणदान होईल.
- मूल्यमापन धोरण करताना विद्यार्थ्यांची कोरोनापूर्व काळातील संपादणूक पातळीही विचारात घेतली जाणार आहे.
दोन परीक्षेची संधी
ज्या विद्यार्थ्यांना शासनाने निश्चित केलेल्या पध्दतीने निकाल समाधानकारक वाटत नसेल तर त्यांना कोरोना १९ची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर मंडळाच्या प्रचलित पध्दतीनुसार श्रेणीसुधार योजनेंतर्गत यापुढील लगतच्या दोन परीक्षांमध्ये प्रविष्ट होण्याची संधी उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांच्या निकालाचे नियमन करण्यासाठी शाळास्तरावर मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची निकाल समिती नियुक्ती केली जाणार आहे.
जूनअखेरपर्यंत दहावीचा निकाल जाहीर केला जाणार असल्याचे शासनाने घोषित केले आहे. तत्पूर्वी सीईटी परीक्षा व त्याचे स्वरूप जाहीर करण्याची गरज आहे. जेणेकरून सीईटीला सामोरे जाताना विद्यार्थी गोंधळणार नाहीत.
- साक्षी खेडेकर, पालक
निकाल मान्य नसेल त्यांच्यासाठी शासनाने दोन वेळा परीक्षेची संधी देऊ केली आहे. मात्र, यामुळे मुलांचा वेळ वाया जाणार आहे. मुलांच्या सुरक्षेमुळे परीक्षा रद्द केली असली तरी सीईटीव्दारे नव्या परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.
- मिनाज खान, पालक
गुणवत्तेनुसार प्रवेश
अकरावी प्रवेश परीक्षा राबविताना सामाईक परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राधान्य दिले जाणार आहे. रिक्त जागांवरही दहावीतील गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जाईल.
कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षेचा प्रश्न असल्यामुळे शासनाला परीक्षा रद्दचा निर्णय घ्यावा लागला. मात्र, सर्व विद्यार्थ्यांना पास करून अकरावीसाठी सीईटी घेण्यात येणार आहे. त्याची तयारी करण्यासाठी मुलांना वेळ देणे गरजेचे आहे.
- दाक्षायिनी बोपर्डीकर, रत्नागिरी
सीईटी परीक्षा दहावीच्या अभ्यासक्रमावर घेण्यात येणार असल्याचे म्हटले असले तरी परीक्षेचे प्रारूप स्पष्ट करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अथवा ऑफलाईन हा निर्णय वेळीच घेऊन मुलांचा सराव शाळास्तरावर करून घेण्याची गरज आहे.
- डॉ. किशोर सुखटणकर, रत्नागिरी
सीईटी परीक्षेला मुले प्रथमच सामोरी जाणार आहेत. त्यामुळे मुलांना त्यासाठी अभ्यासक्रम, परीक्षेचे स्वरूप जाहीर करून अभ्यासासाठी वेळ देणे गरजेचे आहे. शिवाय शाळास्तरावर किंवा कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर सीईटीचा सराव घ्यावा लागेल.
- विजयकुमार रूग्गे, रत्नागिरी