लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनामुळे एप्रिलपासून मंदिरे बंद आहेत. तिसऱ्या लाटेची असलेली भीती व दुसरी लाट ओसरताना, कोरोनाबाधितांची कमी, अधिक होत असलेली संख्या एकूणच कोरोना संक्रमण वाढू नये, यासाठी मंदिरे भाविकांसाठी खुली करण्यास शासनाकडून अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही; मात्र मंदिरे खुली करण्याबाबत विविध पक्षांची मतेही भिन्न आहेत. कोरोनामुळे शासकीय नियमावलीसह काही अटी, शर्ती ठेवून मंदिरे खुली करण्यास परवानगी देण्यात यावी, असे मत बहुतांश भाविक व्यक्त करीत आहेत.
लगतच्या केरळ राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आपल्याकडेही ही संख्या वाढण्याचा धोका आहे. जनतेच्या आरोग्य सुरक्षेसाठी शासनाकडून अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. गतवर्षी दिवाळीनंतर मंदिरे भाविकांसाठी खुली करण्यात आली होती. भाजपाकडून मंदिरे खुली करण्यासाठी राज्यात घंटानाद आंदोलन सुरू आहे. जनतेच्या आरोग्य सुरक्षेसाठी मंदिरे तूर्तास खुली करू नये, असेही काही राजकीय नेत्यांचे मत असले तरी काही मात्र नियमावली जारी करून मंदिरे खुली करण्यास हरकत नसल्याचे सांगत आहेत.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आहे. जनतेच्या आरोग्य सुरक्षेमुळेच शासनाने मंदिरे अद्याप खुली केलेली नाहीत. लगतच्या केरळ राज्यात कोरोनाने पुन्हा उसळी मारली असून आपल्याकडे पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही. कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण कमी झालेनंतर अंदाज घेऊनच योग्य तो निर्णय घेण्यात यावा.
- मिलिंद कीर, माजी नगराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
अनलॉकमध्ये बहुतांश व्यवहार खुले करण्यात आले आहेत. भाविकांच्या भावनांचा आदर ठेवत मंदिरे खुली करण्यासाठी परवानगी देण्यात यावी. त्यासाठी अटी-शर्थी ठेवण्यास हरकत नाही. सोशल डिस्टन्सिंग ठेवत धार्मिक पूजा, दर्शनासाठी मंदिरे खुली करावीत. दूरदृष्टीने नियोजन करून आरोग्य सुविधा अपडेट ठेवाव्यात.
- ॲड. दीपक पटवर्धन, जिल्हाध्यक्ष (दक्षिण) भाजपा.
धार्मिक स्थळे सुरू करण्याबाबत भाविकांच्या भावना नक्कीच महत्त्वपूर्ण आहेत; परंतु आरोग्य सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मंदिरे बंद राहणे योग्य आहे. शासनाने अनलॉकमध्ये विविध व्यवहार सुरू केले असताना होणारी गर्दी अभिप्रेत आहे. धार्मिक स्थळे सुरू केल्यावर होणारी गर्दी व कोरोना संक्रमणाचा धोका आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
- विलास चाळके, जिल्हा प्रमुख शिवसेना
कोरोनामुळे धार्मिक स्थळे अद्याप बंद आहेत; मात्र सद्यस्थितीत कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. त्यामुळे धार्मिक स्थळांमध्ये प्रार्थना, पूजेसाठी जाणाऱ्या भाविकांना काही नियमावली निश्चित करून धार्मिक स्थळे खुली करण्यासाठी परवानगी देण्यात यावी. सोशल डिस्टन्सिंग ठेवत धार्मिक स्थळेही खुली करावीत.
- हारीस शेकासन, जिल्हाध्यक्ष काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग.
उत्पन्नावर परिणाम
गेल्या वर्षी आठ महिने त्यानंतर यावर्षी अद्याप पाच महिने मंदिरे बंद असल्याने मंदिरांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. मंदिराबाहेर पूजा व अन्य साहित्य विक्री करणारे व्यावसायिकही संकटात आहेत.
भाविकांची ये-जा सुरू असते, त्यावेळीच मंदिराला आर्थिक उत्पन्न प्राप्त होते; परंतु गेले वर्षभर मंदिरे बंद आहेत. त्यामुळे मंदिरांच्या उत्पन्नात घट झाली आहे.
कोरोना संसर्ग कमी झाला आहे. स्थानिक नियमावली जाहीर करून जिल्हा पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांना मंदिरे खुली करण्यासाठी परवानगी द्यावी. मंदिरे बंद असल्याने देखभाल दुरूस्ती, पुजारी मानधनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पूजा साहित्य विक्री व्यवसाय ठप्प झाला आहे.
- रवींद्र सुर्वे, अध्यक्ष श्रीदेव- भैरी देवस्थान रत्नागिरी.
अनलॉकमध्ये टप्प्याटप्प्याने व्यवहार खुले करण्यात आले आहेत. वर्षभर मंदिरे बंद आहेत. त्यामुळे मंदिरांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. कर्मचारी, पुजारी वेतन असो, विजेची बिले, अन्य देखभाल दुरूस्ती खर्च भागविणे अवघड झाले आहे. शासनाने नियमावली ठेवून मंदिरे खुली करण्यासाठी परवानगी द्यावी.
- विनायक राऊत,
विश्वस्त, श्री क्षेत्र गणपतीपुळे.