लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : तिखट, मसालेदार, चमचमीत पदार्थ आहारात मोठ्या प्रमाणावर आल्यास पोटाच्या अल्सरचा त्रास होऊ शकतो. पचनमार्गाच्या आवरणावर जखमा झाल्याने अल्सर आजार होतो. अल्सर आतड्याच्या पहिल्या भागात किंवा पोटात होतो. हेलिकोबॅक्क्टर पायरोली नावाच्या जिवाणूमुळे बरेचसे अल्सर होतात.
काहीजणांना अतितिखट, मसालेदार पदार्थ खाण्याची सवय असते. अशा तिखट, चमचमीत पदार्थांमुळे पचनमार्गाच्या आवरणावर जखमा होतात. आम्ल व इतर पाचक द्रव्ये पचनमार्गावर जळजळ करून अल्सर होण्यासाठी अनुकूल ठरतात. शारीरिक आणि मानसिक त्रासामुळेही अल्सरचे प्रमाण वाढते. त्यामुळे तीव्र पोटदुखी, पोट जड वाटणे, आंबट ढेकर येणे, जळजळ, पोट बिघडणे, उलटी, मळमळ जाणवणे, उलटीवाटे रक्त जाणे, छातीत जळजळणे आदी लक्षणे दिसू लागतात.
अल्सर धोकादायक असेल तर काही लक्षणे अधिक तीव्र होतात. त्यामुळे उलटीवाटे, शाैचावाटे रक्त जाणे, सतत उलट्या होणे, अशक्तपणा, वजनात घट, पोटात अचानक जोरात दुखणे, औषध घेऊनही पोटदुखी न थांबणे आदी लक्षणे सुरू होतात.
काहीवेळा अशुद्ध पाण्यातून जिवाणूंचा संसर्ग होतो. त्यामुळेही पोटाचा अल्सर होण्याचा धोका संभवतो, तसेच अवेळी आहार, बराच काळ पोट रिकामे रहाणे यामुळेही अल्सरचा त्रास होऊ शकतो. त्यासाठी जेवणाची वेळ नियमित असावी. आहारात जास्त तिखट, मसालेदार, तेलकट, जळजळ करणारे पदार्थांचा वापर करू नये, जागरण करू नये, भरपूर पाणी, तेही शुद्ध स्वरूपातीलच प्यावे, असा सल्ला आरोग्य तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.
........................
काय आहेत लक्षणे?
- पोट दुखणे
- उलट्या होणे
- भूक मंदावणे
- वजनात अचानक घट होणे
.......................................
काय काळजी घेणार?
धूम्रपान टाळणे, डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे, कॅफेनचे सेवन करणे टाळावे.
दारूचे अतिसेवन टाळावे. दारूतील असलेल्या अल्हाेकोलमुळेही अल्सरचा त्रास अधिक वाढतो.
पिण्याचे पाणी अशुद्ध असेल तर त्यातील जिवाणूंमुळेही आतड्याला किंवा जठराला किंवा आतड्याच्या पहिला भागाला जखमा होतात. त्यामुळे भरपूर आणि शुद्ध पाणी प्यावे.
वेळी, अवेळी खाणे टाळावे, वेळेत जेवण घ्यावे. बराच काळ पोट रिकामे ठेवू नये.
मनावर असलेला अतिरिक्त ताणही अल्सरला आमंत्रण देतो. रात्री उशिरापर्यंत जागरण टाळावी.
..........................
पाैष्टिक आहार हाच महत्त्वाचा
अल्सरची अनेक कारणे आहेत, त्यातील अतितिखट, मसालेदार पदार्थ खाणे, अवेळी जेवणे आदी महत्त्वाची कारणे आहे. त्याचबरोबर दूषित पाणी हेही महत्वाचे कारण आहे. त्यामुळे अल्सरला दूर ठेवायचे असेल तर त्यासाठी शरीरात आम्ल वाढविणारे पदार्थ न खाता त्रासदायक नसलेले पण पाैष्टिक पदार्थ यांचा समावेश आहारात असणे गरजेचे आहे. तसेच जागरण, मनावरील ताण टाळते, हेही गरजेचे आहे.
- डाॅ. रवींद्र गोंधळेकर, पोट विकारतज्ज्ञ, रत्नागिरी.
...................................
गॅस्ट्रीक अल्सर म्हणजे पोटाचा अल्सर होणे. यात मोठ्या प्रमाणावर होणारी ॲसिडीटी, पित्ताचा त्रास, चहाचे, मद्याचे अतिप्रमाण, जागरण ही अनेक कारणे आहेत. त्यामुळे अल्सरला दूर ठेवण्यासाठी तणाव दूर ठेवणे, जागरण टाळणे, जेवणातील अनियमितता याबरोबरच हलका पाैष्टिक आहार घेणे, गरजेचे आहे.
- डाॅ. सुजित जाधव, जनरल फिज़िशियन रत्नागिरे.