रत्नागिरी : संस्कृत ही संस्काराने सिध्द झालेली भाषा असल्याचे प्रतिपादन डॉ. सिध्दार्थ वाकणकर (गुजरात) यांनी केले. गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाचे वाङमय मंडळ आणि संस्कृत विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संस्कृत आणि आधुनिक भारतीय भाषा’ या विषयावर वाकणकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. संस्कृतगीत गायनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. संस्कृत हा भारतीयांचा वारसा आहे. डॉ. आठल्ये यांनी या भाषेचं महत्त्व प्रस्तावनेमध्ये विषद केले. हस्तलिखितशास्त्रामध्ये पारंगत असलेले डॉ. सिध्दार्थ वाकणकर यांचा सत्कार कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. अतुल पित्रे यांच्या हस्ते करण्यात आला. ‘संस्कृत’ ही राष्ट्रभाषा होऊ शकली नाही, याविषयी डॉ. वाकणकर यांनी खंत व्यक्त केली. संस्कारांनी सिध्द झालेली भाषा म्हणजे संस्कृत. भारतीय भाषांच्या व्याकरणावर व भारतीय बोलीवरही संस्कृत भाषेचा प्रभाव आहे. देश, विदेश व प्रादेशिक भाषांना संपन्न करणारी संस्कृत ही उपदेशपरही भाषा आहे. डॉ. आंबेडकरांनी संस्कृत राष्ट्रभाषा म्हणून सुचविली असतानाही राष्ट्रभाषा होऊ शकलेली नाही, याची खंत वाटते, असे विचार व्यक्त केले. डॉ. वाकणकर यांनी महाविद्यालयात तीन दिवसांची हस्तलिखित कार्यशाळाही घेतली. समारोपात डॉ. अतुल पित्रे यांनी प्रेरणादायी कार्यक्रम घेतल्याबद्दल वाङमय मंडळाचे कौतुक केले. ‘संशोधन’ हा मुद्दा अधोरेखित केला. डॉ. कल्पना आठल्ये यांनी सूत्रसंचालन केले. वाङमय मंडळ प्रमुख प्रा. श्रध्दा राणे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
संस्कृत ही संस्कारांमधून सिध्द झालेली भाषा सिध्दार्थ वाकणकर :
By admin | Updated: August 13, 2014 23:30 IST