रत्नागिरी : येथील जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या रक्तपेढीत सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे या रक्तपेढीला गरोदर माता, बालके, डायलिसीस शस्त्रक्रिया, अपघाती रूग्ण यांना रक्तपुरवठा करण्यास अडचणी येत आहेत. सध्या कोरोनाबाधितांची वाढती संख्या आणि प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढला आहे. त्यामुळे दात्यांची संख्या घटली आहे.
जिल्हा शासकीय रूग्णालयात विविध आजारांचे रूग्ण तसेच वाढत्या अपघातांच्या संख्येमुळे दरदिवशी सरासरी २५ ते ३० रक्तपिशव्यांचा पुरवठा करावा लागतो. महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत शासकीय तसेच खासगी रुग्णालयांत दाखल असणाऱ्या रुग्णांसाठी (विशेषत: हृदयशस्त्रक्रिया, डायलिसीस) नि:शुल्क रक्तपुरवठा करण्यात येतो. त्याचबरोबर जिल्हा रूग्णालयातील शस्त्रक्रिया, प्रसुती, थॅलेसिमिया, हिमोफिलीया रूग्ण, आर्थिक दुर्बल घटक, ज्येष्ठ नागरिक रूग्ण आदींसाठी मोफत रक्तपुरवठा केला जातो.
रक्ताची वाढती गरज लक्षात घेता यासाठी शिबिरांच्या तसेच स्वैच्छिक रक्तदानाच्या माध्यमातून रक्त संकलित करावे लागते. एप्रिल ते जून या कालावधीत सुट्यांचा कालावधी असला तरी याच कालावधीत विविध साथीच्या आजाराच्या रूग्णांबरोबरच अपघातांची संख्या वाढल्याने जिल्हा रूग्णालयाला रक्त कमी पडत असल्याचे चित्र निर्माण होते. मात्र, या रक्तपेढीची टीम आवश्यक असेल तेव्हा शिबिराचे आयोजन करून रक्तदात्यांना आवाहन करते. वार्षिक २००० इतके रक्तसंकलन करणारी जिल्हा रूग्णालयाची रक्तपेढी आता वार्षिक ६००० बॅग्ज इतके रक्तसंकलन व तितकाच रक्तपुरवठा करत आहे.
सध्या या रूग्णालयात विविध साथींच्या आजारांची रूग्णसंख्या वाढू लागली आहे. तसेच प्रसुती, डायलिसीस रूग्ण तसेच सध्या डेंग्यूचे रूग्ण वाढल्याने त्यांनाही प्लेटलेट्सची गरज मोठ्या प्रमाणावर भासत आहे. त्या तुलनेने या रक्तपेढीला अचानक रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने दात्यांची संख्या कमी झाली आहे. सध्या वाढलेल्या लसीकरणाचा परिणामही रक्त संकलनावर होत आहे.
सध्या या रक्तपेढीला दिवसाला अगदी १० पिशव्याही मिळणे अवघड झाले आहे. सर्वच गटांचे रक्त उपलब्धच नसल्याने विविध रूग्णांची गैरसाेय होत आहे. त्यामुळे रक्त संकलनासाठी सध्या रक्तदात्यांच्या सहकार्याची गरज निर्माण झाली आहे. या रक्तपेढीची समस्या जाणून घेऊन दात्यांनी सहकार्याचा हात पुढे करावा व जिल्हा रूग्णालयात सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत स्वेच्छेने रक्तदान करून रूग्णसेवेला हातभार लावावा, असे आवाहन रक्तपेढीतर्फे करण्यात आले आहे.
कोराेना संसर्गामुळे दाते बाधित...
जिल्ह्यात सध्या कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्याने अनेक दाते संक्रमित झाले आहेत. तसेच कोरोनाबाधित झालेल्यांना तीन महिन्यानंतरच रक्त देता येते. त्यामुळे याचा परिणाम दात्यांचे प्रमाण कमी होण्यावर झाला आहे.
लसीकरणामुळेही दाते घटले...
लस घेतल्यानंतर १४ दिवसांनी रक्तदान करता येते. सध्या लसीकरणाची मोहीम वेगात सुरू आहे. त्यामुळे काहींनी पहिला डोस घेतल्यास १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला नाही तर काहींनी दुसरा डोसही घेऊन १४ दिवस पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे अनेक दात्यांना इच्छा असूनही रक्त देता येत नाही.
निर्बंध उठल्याचाही परिणाम...
जिल्हा प्रशासनाने निर्बंध उठवले आहेत. त्यामुळे आता सर्व दुकाने, व्यवसाय सुरू झाले आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून सर्वच बंद राहिल्याने व्यवसाय सुरू होताच व्यावसायिक आता पूर्णवेळ व्यग्र राहात आहेत. त्यामुळे रक्तदानासाठी काहीजणांकडून कारणे सांगितली जात आहे.
कोटसाठी
सध्या जिल्हा रूग्णालयात विविध रक्तगटांची तीव्र टंचाई भासत आहे. विविध शस्त्रक्रिया, प्रसुती याबरोबरच डेंग्यूचा वाढता आजार यामुळे रक्ताची मागणी वाढली आहे. मात्र, सध्या जिल्हा रूग्णालयाच्या रक्तपेढीत सर्वच रक्तगटांचा तुटवडा आहे. त्यामुळे दात्यांनी रक्तदानासाठी पुढे यावे.
- योगिता सावंत, जनसंपर्क अधिकारी, जिल्हा शासकीय रूग्णालय रक्तपेढी, रत्नागिरी