चालता चालता बंडोपंत म्हणाले, “साहेब, उगाच मखर पाहून टीकाटिपणी करू नका. नाहीतर मुलं नाराज होतील. जे आहे ते चांगलंच म्हणा.” आम्ही आपली मान डोलवली. मग, आम्ही मखर केली तेथे पोहोचलो. मुलांनी मस्त एका चौथऱ्यावर छोटी शेड उभी करून मखर बांधली होती. लाकडी पट्ट्या, लोखंडी पाइप, रंगीत प्लास्टिक पेपर आणि कृत्रिम पाना-फुलांनी मखर सजवलेली होती. मुलं सांगू लागली, “इथे बोर्ड लिहिणार की, ‘गणपतीचे दर्शन घेण्यासाठी कोरोनाचे नियम पाळा.’ इथे सॅनिटायझर स्टॅण्ड बसवणार.” आम्ही मुलांनी केलेल्या किंवा करणाऱ्या गोष्टी पाहून आश्चर्यचकित झालो. तोवर एक जण म्हणाला, “लाव रे तो लाईट!” तशी लाईट लागली. सगळे एलईडी बल्ब पेटले. मग काय मखर चमकून निघाली. आम्हाला खूप आनंद झाला. आम्ही मुलांचे तोंडभरून कौतुक केले. मुले खूश झाली. तेवढ्यात आनंदाच्या भरात आमचा हात लोखंडी पायपाला लागला आणि आम्हाला जोरदार शॉक बसला. तसा आम्ही झटकन हात मागे घेतला. नि म्हणालो, “अरे मुलांनो, इथे शॉक लागतोय. बघून घ्या जरा.” अचानक शॉक लागल्याने आमचा चेहरा पार पडून गेला. तसे बंडोपंत खो - खो हसत म्हणाले, “साहेब, तुम्ही काहीही म्हणा तुम्ही खूप भाग्यवान आहात. तुम्हाला माहीत आहे का? असा शॉक बसणारी माणसं प्रसिद्ध असतात. ती शॉक देतात आणि शॉक घेतातही. वा.. वा.. मानलं तुम्हाला! इथे आता प्रेस फोटोग्राफर किंवा चॅनेलवाले असते तर तुम्हाला शॉक कसा लागला, पाकिस्तानी आहेत का त्यामागे? क्लोजअपमध्ये तुमचा घाबरलेला चेहरा. मध्येच तुम्ही हात मागे घेताना स्लोमोशन व्हिडिओ. मग त्यावर राजकीय विश्लेषकांचं भाष्य. निवेदकांचे मोठमोठे प्रश्न. मग विरोधी पक्षाच्या टीकाटिपण्या. झाल्या प्रकरणाची सीबीआय चौकशीची घोषणा. तुमची मुलाखत. त्यातील भाष्यावर पुन्हा चर्चासत्र...” बंडोपंत चेन्नई एक्स्प्रेससारखे सुसाट बोलायला लागले. आम्ही शॉक बसलेला पार विसरून गेलो हो. त्यांच्या सुसाट गाडीकडे नुसते भांबावून पाहत राहिलो आणि मुलं तर पार अर्धमेली झाली. आपण साहेबांना बोलावलं काय नि झालं काय? तसे बंडोपंतांना आम्ही थांबवत म्हणालो, “अहो, आपण सामान्य माणूस. एवढ्याशा शॉकची कोण दखल घेईल? कशाला एवढ्या कल्पना करून आम्हाला पार घाबरवून टाकता?” तसे बंडोपंत मिशीत हसून म्हणाले, “साहेब, डिक्टो असाच शॉक बसलेला एका मोठ्या माणसाला. तेव्हा जे घडलं होतं त्या जागी तुम्हाला ठेवून फक्त आम्ही रनिंग कॉमेंट्री केली.” मुलं गयावया करू लागली, तसे आम्ही म्हणालो, “शॉकप्रूफ आहोत आम्ही. काळजी करू नका!” तसे बंडोपंत म्हणाले, “अब हुई ना बात! चलो.” मुलं त्यांच्या कामाला लागली. आम्ही दोघेही घरी निघालो. बंडोपंताना म्हणालो, “काहीही म्हणा पण तुमच्या बोलण्यात काहीतरी स्पिरीट आहे. चला, जरा चहा पिऊ या.” तसे बंडोपंत म्हणाले, “काय राव, तुम्ही तर शॉकप्रूफ माणूस! हे आज कळाले. चला, आज आमच्याकडेच अमृत चहा घेऊ.” बंडोपंतानी आम्हास एवढा मोठा किताब बहाल केल्याने आम्हाला त्यांच्या मागे जाण्याशिवाय गत्यंतर नव्हते.
- डॉ. गजानन पाटील