रत्नागिरी : जिल्ह्यात झालेल्या ४६१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत तीनशेपेक्षा अधिक ग्रामपंचायतींवर भगवा फडकवून शिवसेनेने आपले राजकीय वर्चस्व कायम राखले आहे. रत्नागिरी, राजापूर, लांजा, संगमेश्वर, खेड, दापोली या सहा तालुक्यात सेनेचे वर्चस्व सिध्द झाले आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघात मात्र माजी मंत्री भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीची जादू कायम ठेवली आहे. राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांना त्यांच्या खेड-दापोली मतदारसंघाचा गड मात्र पुरेशा ताकदीने राखता आला नाही. गेल्या दोन महिन्यांच्या काळात रत्नागिरी जिल्ह्यातील ४६१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची धूम होती. त्यातील ३३१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. उर्वरित ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. प्रत्यक्षात निवडणूक झालेल्या काही ग्रामपंचायतींमध्येही काही जागा बिनविरोध झाल्या होत्या. ३३१ ग्रामपंचायतींच्या या निवडणुकींमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले होते. प्रथमच या ग्रामपंचायत निवडणूका सेना व भाजपातर्फे स्वतंत्रपणे लढविण्यात आल्या. त्यात शिवसेनेने जिल्ह्यात आपले वर्चस्व कायम असल्याचे दाखवून दिले आहे. रत्नागिरी तालुक्यात तालुकाप्रमुख बंड्या तथा प्रदीप साळवी यांनी शिवसेनेचे जाळे चांगले बांधले आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून येथे शिवसेनेची ताकद मोठी आहे. तालुक्यातील निवडणूक प्रक्रियेत असलेल्या ५१पैकी ४१ ग्रामपंचायतींवर शिवसेनेने वर्चस्व राखले. लांजा, राजापूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. राजापूर तालुक्यातील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिकांच्या पाठीशी शिवसेनेचे आमदार राजन साळवी उभे ठाकले आहेत. त्यांना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा पूर्ण पाठिंबा आहे. या प्रकल्पाविरोधात शिवसेनेच्या भूमिकेमुळे लांजा -राजापूरमध्ये शिवसेनेच्या बाजूने वातावरण होते. त्याचा प्रत्यय ग्रामपंचायत निवडणुकीत दिसून आला. लांजातील २१ पैकी १६ ग्रामपंचायती सेनेने राखल्या. राजापूरमध्येही ५१पैकी ३८ ग्रामपंचायतींवर सेनेचा भगवा फडकला आहे. संगमेश्वरमध्ये ७४पैकी ५७, खेडमध्ये ८६पैकी ५९, दापोलीत ५० पैकी ४३, तर मंडणगडमध्ये सेना व राष्टवादीची ताकद समान पातळीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. खरेतर खेड व दापोली या विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम हे प्रतिनिधीत्व करीत आहेत. सेनेकडे असलेला हा मतदारसंघ सूर्यकांत दळवी यांचा पराभव करून संजय कदम यांनी राष्ट्रवादीकडे खेचून आणला. मात्र, ती ताकद ग्रामपंचायत निवडणुकीत दिसली नाही. खेडमध्ये सेना-मनसे पॅटर्नचा बोलबाला होता. चिपळूणातही सदानंद चव्हाण हे सेनेचे आमदार आहेत. परंतु भास्कर जाधव यांनी येथेही सेनेला निर्भेळ यश मिळू दिले नाही. गावविकास पॅनेल्स याठिकाणी मोठ्या संख्येने विजयी झाली आहेत. तसेच राष्ट्रवादीने १३ ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविले आहे. या लढाईत सेनेने आज तरी आघाडी घेतली आहे मात्र भाजपचाही प्रवेश महत्वाचा आहे. (प्रतिनिधी)
शिवसेनेचे वर्चस्व; राष्ट्रवादीने गुहागर राखले
By admin | Updated: April 25, 2015 01:09 IST