रत्नागिरी : निवडणुकीचे अर्ज भरताना स्वबळ आजमावण्याची घोषणा करणाऱ्या शिवसेनेने जिल्हा मध्यवर्ती बँकेत पाच जागा जिंकल्या असल्या तरी शिवसेनेची प्रचाराची केलेली तयारी आणि त्यांना असलेली मोठ्या यशाची अपेक्षा पाहता हे यश फारसे उजवे नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जबरदस्त ताकद असलेल्या शिवसेनेला सहकारात मात्र धडा मिळाला आहे. त्यातुलनेत स्वकियांकडून अनेक आरोप होऊनही राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपच्या सहकार पॅनेलने मिळालेले निर्विवाद वर्चस्व उल्लेखनीय आहे.रत्नागिरी जिल्ह्यात मुळातच सहकाराची मुळं खोलवर रूजलेली नाहीत. अत्यंत अल्प सहकारी संस्था उल्लेखनीय काम करत आहेत. उर्वरित संस्था या केवळ नावापुरत्याच स्थापन झाल्या आहेत. त्यातही ज्या संस्था आहेत, त्यावर पूर्वापार काँग्रेसचेच वर्चस्व आहे. स्व. गोविंदराव निकम यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या संस्थांची संख्या अधिक आहे. त्यामुळे साहजिकच पूर्वीच्या काँग्रेसचे आणि आताच्या राष्ट्रवादीचे त्यावर मोठे वर्चस्व आहे.गेल्या दोन निवडणुकांप्रमाणेच याहीवेळी शिवसेनेने निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी केली ती निवडणुकीचे अर्ज भरण्याची मुदत सुरू झाल्यानंतरच. त्याआधी सहकार पॅनेलकडून डॉ. तानाजी चोरगे यांनी बिनविरोध निवडणुकीचा प्रस्ताव शिवसेनेसमोर ठेवला होता. मात्र अधिक जागांची अपेक्षा असलेल्या शिवसेनेने तो फेटाळला.ऐन अर्ज भरण्याच्या काळात राष्ट्रवादीच्याच रमेश कदम यांनी जिल्हा बँकेवर विशेषत: डॉ. तानाजी चोरगे यांच्यावर भ्रष्टाचारचे आरोप केले. त्यामुळे शिवसेनेला प्रचार करण्यासाठी मैदान मोकळेच झाले. मात्र ज्या चिपळुणात रमेश कदम यांनी डॉ. चोरगे यांच्यावर आरोप केले, त्याच चिपळूण तालुक्यात डॉ. चोरगे यांना ३४ मते मिळाली तर त्यांच्याविरोधी अनंत तेटांबे यांना केवळ सात मते मिळाली. यावरूनच सहकारावर राष्ट्रवादीचा पगडा किती आहे, हे दिसून येते.शिवसेनेने खरे तर आपली बरीच ताकद या निवडणुकीत पणाला लावली होती. आतापर्यंत निवडणुकांचे आणि प्रचाराचे व्यवस्थापन पडद्यामागून पाहणारे रत्नागिरीतील उद्योजक किरण सामंत यावेळी पहिल्यांदाच पडद्यामागून पुढे आले. त्यांनी दाखवलेले व्यवस्थापन कौशल्य ही शिवसेनेला जमेची बाजू ठरली. शिवसेनेच्या खासदार, आमदारांनी या निवडणुकीत लक्ष घालण्याची ही पहिलीच वेळ. त्या अर्थाने शिवसेनेने यापूर्वीच्या निवडणुकांपेक्षा जास्त प्रचार केला, हे स्पष्ट होते. त्यामुळेच गतवेळी दोन संचालक असलेल्या शिवसेनेचे यावेळी पाच संचालक झाले आहेत. पण या पाच संचालकांपैकी गणेश लाखण, आदेश आंबोळकर आणि किरण सामंत हे आत्ता शिवसेनेचे असले तरी आधी ते शिवसेनेत नव्हते. त्यामुळे शिवसेनेला अधिक जागा मिळाल्या असल्या तरी ते शिवसेनेचे इतर निवडणुकांसारखे दणदणीत यश नाही. त्या तुलनेत स्वकियांनी केलेल्या आरोपांनंतरही सहकार पॅनेलने मिळवलेले यश महत्त्वाचे आहे.गत निवडणुकीत शिवसेनेचे दोन आणि तीन बंडखोर उमेदवार संचालक झाले होते. त्यामुळे सहकार पॅनेलला फार मोठा धक्का बसलेला नाही. रत्नागिरीतील नाना मयेकर आणि लांजातील सुरेश साळुंखे या दोन जागांवरील सहकार पॅनेलचे अपयश वगळता उर्वरित निकाल त्या पॅनेलला अपेक्षितच लागले आहेत. (प्रतिनिधी)
शिवसेनेला मिळाला धडा राष्ट्रवादीला सत्तेचा घडा
By admin | Updated: May 8, 2015 00:15 IST