आॅनलाईन लोकमतअडरे : भारतीय राज्य घटनेमुळे सर्वसामान्य माणसाला जगण्याचा हक्क मिळाला, बाबासाहेबांचे कार्य सर्वसमावेशक होते, त्यांनी केलेल्या अहोरात्र कार्यामुळे सर्वसामान्य समाजाची सुप्त अस्मिता प्रज्वलित झाली आणि हा समाज स्वत:च्या पायावर आत्मनिर्भयपणे उभा राहिला, असे मत आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केले.
येथील नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आनंदराज आंबेडकर यांचे आंबेडकरी चळवळीचे भवितव्य या विषयावर व्याख्यान झाले. याप्रसंगी व्यासपीठावर नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे व्हाईस चेअरमन उदय गांधी, विवेक गिजरे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्याम जोशी, संयोजक डॉ. दादासाहेब खडसे आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते. डॉ. खडसे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी गतवर्षी १२५व्या जयंती महोत्सवात झालेल्या कार्यक्रमाचा आढावा घेतला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. जी. बी. राजे यांनी करून दिला. सलग १८ तास अभ्यास हे अभियान गेल्या वर्षीपासून राबविण्यात येत आहे. यासाठी ग्रंथपाल सुधीर मोरे, प्रा. ज्ञानोबा कदम, अजय कांबळे, गुरुनाथ साळुंखे यांनी परिश्रम घेतले. प्रा. विनायक बांद्रे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)