चिपळूण : मकर संक्रांतीचा सण गावोगावी, वाडीवस्तीवर घराघरातून साजरा केला जातो. यावेळी सौभाग्यवती हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करतात. सार्वजनिक व वैयक्तिक स्तरावर साजरा होत असलेल्या या सणात आप्तस्वकिय, मैत्रिणी आणि सखींचा स्नेहबंधाचा परिघ असतो. या साऱ्याला छेद देत दिशांतर संस्थेच्या सचिव सीमा यादव यांनी आदिवासी पाड्यावर हळदी-कुंकू समारंभ करीत तेथील महिलांना भेटवस्तूचे वाण दिले. यावेळी शालांत परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थिनींना पुढील शिक्षण वा नोकरीसाठी सहकार्याचे वचन दिशांतरतर्फे देण्यात आले. आदिवासी - कातकरी पाड्यावर सहकार्याचा स्नेहार्द हात देण्यात आला. यानंतर मूळ हेतू समोर ठेवून परिवर्तनाचे प्रत्यंतर काही वाड्यावस्त्यांवर घडवून आणण्यात यश आले. एकूणच समाजाच्या प्रवाहात येण्यासाठी रोजगार, अन्न, निवारा, आरोग्य, शिक्षण या स्तरावर काम होणे अपेक्षित असते. दुसऱ्या टप्प्यात शिक्षणासोबत जातीचा दाखला, नोकरीच्या संधी यासंदर्भातील काम अधिक वेगाने होणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर ओवळी - राजवाडा येथे दिशांतरचा उपक्रम झाला. भेटवस्तू केवळ सौभाग्यवतींनाच नाही, तर ती आम्हालाही देण्यात आली. यामुळे आम्हाला आमचं कुंकू आठवलं. सुरुवातीला एका महिलेने भेटवस्तू घेण्यास नकार दिला. पण, असं काही मनात आणायचं नाही, हे तुम्हा सर्वांसाठी आहे, असं सांगताच त्याचा स्वीकार केला. आदिवासी पाड्यावरील महिलांनी सांगितले की, आमच्या मुली शिकताहेत, कुणी पाचवी, तर कुणी आठवीला आहे. त्यांच्या पुढील शिक्षणाचं कसं करायचं? दिशांतरच्या ज्ञानयज्ञ प्रकल्पाविषयी माहिती असल्याने असा प्रस्ताव येणे व तो शिक्षण व करिअरसंदर्भाने यावा, हा मागणीतील बदलाचा भाग ठरला. आदिवासी वाड्या - पाड्यांवर जाऊन महिलांचे प्रश्न समजावून घेऊन त्याबाबत प्रत्येकानेच सजग राहावे हाच संदेश यातून दिला गेला. (प्रतिनिधी)
आदिवासींच्या कपाळाला हळदीकुंकवाचा मान
By admin | Updated: January 30, 2015 23:16 IST