राजापूर : प्रस्तावित ग्रीन रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करून त्याच्या समर्थनार्थ राजापूर नगर परिषदेने केलेला ठराव आणि घेतलेली भूमिका निश्चितच स्वागतार्ह आहे. शहर आणि तालुक्याच्या विकासाचा दूरदृष्टिकोन ठेवून नगर परिषदेतील सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीने हे उचललेले पाऊल निश्चितच भविष्यातील विकासाला नवी दिशा देणारे ठरेल, अशी प्रतिक्रिया ग्रीन रिफायनरी प्रकल्प समर्थन समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. शशिकांत सुतार यांनी ‘लोकमत’ला दिली आहे. या प्रकल्पाच्या समर्थनाच्या ठरावावर रोखठोक मत प्रदर्शन करून ठरावाचे समर्थन करणाऱ्या शिवसेनेच्या त्या दोन्ही नगरसेविकाही तेवढ्याच कौतुकास पात्र असून, त्यांनी घेतलेली भूमिका ही विकासाची भूमिका आहे, त्याचे स्वागतच केले पाहिजे, असेही अॅड. सुतार यांनी नमूद केले.
राजापूर नगर परिषदेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत प्रस्तावित ग्रीन रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ ठराव मंजूर करण्यात आला आहे. याला शिवसेनेच्या प्रतीक्षा खडपे व मनीषा मराठे या दोन नगरसेविकांनी समर्थन दिले आहे. त्यामुळे याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. या समर्थनाच्या भूमिकेचे सर्वत्र स्वागत होत असून, सुमारे ५० सामाजिक संस्था व प्रतिनिधींच्या ग्रीन रिफायनरी प्रकल्प समर्थन समन्वय समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष अॅड. सुतार यांनी स्वागत केले आहे.
या प्रकल्पामुळे होणारे फायदे, विकासात्मक प्रगती आणि भविष्यातील दिशा ओळखून नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे आणि त्यांच्या सहकारी नगरसेवकांनी घेतलेली भूमिका ही कौतुकास्पद आहे. शहर आणि तालुक्याचा विकास हाच दृष्टिकोन ठेवून त्यांनी हे पाऊल उचलले असून, हेच खरे लोकप्रतिनिधींचे काम आहे. विरोधाला विरोध आणि सोयीच्या भूमिका न घेता प्रत्यक्षात एखाद्या प्रकल्पाबाबत परिपूर्ण माहिती घेऊन त्यापासून होणाऱ्या क्रांतिकारी बदलाला आणि जनतेच्या मताला महत्त्व देऊन लोकप्रतिनिधींनी निर्णय घ्यावयाचे असतात, हेच या कृतीतून नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांनी दाखवून दिले आहे, असे ते म्हणाले.
आम्ही कपाळकरंटेच
लोकप्रतिनिधींनी जनतेचे प्रतिनिधी म्हणून काम करताना चांगले काय आणि वाईट काय, हे जनतेला समजावून सांगितले पाहिजे. राजापुरात मात्र ते होताना दिसत नाही, हे राजापूरकरांचे दुर्दैव असल्याचे अॅड. सुतार यांनी सांगितले. अनेक लोकप्रतिनिधी उद्योगधंदे आपल्या भागात नेण्यासाठी प्रयत्न करतात. त्यासाठी त्यांची चढाओढ असते, पण आमच्याकडे मात्र आलेला जगातील सर्वांत मोठा उद्योग, तालुका, जिल्हाच नव्हे तर राज्य आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा देणारा रिफायनरीसारखा प्रकल्प होऊ नये, तो आमच्या भागात येऊ नये, यासाठी आमचे लोकप्रतिनिधी प्रयत्न करतात यासारखे कपाळकरंटे आम्हीच, अशी टीकाही त्यांनी केली आहे.