दापोली/शिवाजी गोरे : दाेन्ही पायाने अपंग त्यामुळे नीटसे उभेही राहता येत नाही. एकाच ठिकाणी जास्त वेळ बसताही येत नाही. मात्र, मूर्तिकलेची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. बाप्पाची मूर्ती घडविण्याची जिद्द मनाशी बाळगून गणपती बाप्पांची सेवा या हेतूने मूर्ती घडविण्याचे काम आंजर्ले (ता. दापाेली) येथील मूर्तिकार मंगेश महाडिक गेले ३५ वर्षे करत आहेत.
आंजर्ले येथील दत्तात्रय पवार यांच्या मूर्ती शाळेत शाडूच्या मातीच्या मूर्ती घडवल्या जात आहेत. कुटुंबातील सर्वांच्या मदतीने मूर्ती तयार करण्याचे काम केले जात आहे. या कारखान्यांमध्ये ५०० शाडूच्या मूर्ती बनविल्या आहेत.
आंजर्ले गावातील मूर्तिकार यशवंत पवार यांनी ६० वर्षांपूर्वी गणेशमूर्तीचा कारखाना सुरू केला होता. बालवयातच दत्तात्रेय यशवंत पवार व बाळकृष्ण यशवंत पवार या दोन भावांनी वडिलांकडून ही कला शिकून घेतली. याच कारखान्यांमध्ये मंगेश महाडिक यांनीही मूर्ती घडविण्याचा श्रीगणेशा बालवयात केला. कारखान्याचे मालक यशवंत पवार यांच्याकडे येऊन ते मूर्तीला रंग देण्याचे काम करू लागले हळूहळू शाडूच्या मूर्ती बनवण्याची कला त्यांना अवगत झाली आणि आजही ते ही कला आनंदाने जाेपासत आहेत. कारखान्यातील मूर्ती उचलणे किंवा मूर्ती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी हलवणे त्यांना शक्य होत नाही. त्यासाठी त्यांचे सहकारी त्यांना मदत करतात.
---------------------
अलीकडे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीची क्रेज आहे; परंतु गेलीस ६० वर्षे शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती या कारखान्यात बनविला जात आहेत. वडिलांकडून चालत आलेला हा वारसा जोपासण्याचे काम सुरू आहे. या कारखान्यांमध्ये संपूर्ण कुटुंबातीलच मंडळी काम करत आहेत. भक्तांना वेळेत मूर्ती देण्याला प्राधान्य दिले जाते.
- दत्तात्रय पवार, मूर्तिकार.
------------------
पंचक्रोशीत शाडूच्या मातीपासून मूर्ती बनविणारा एकमेव कारखाना अशी आमची ओळख आहे. या कारखान्यातील गणेशमूर्ती भक्तांना आवडतात. शाडूच्या पर्यावरण पूरक मूर्ती असल्याने पंचक्रोशीतील भक्तांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
-बाळकृष्ण पवार, मूर्तिकार.
-------------------------
गणपती बापाची सेवा करायला मिळावी या हेतूने आपण मूर्ती घडविण्याचे काम करीत आहाेत. या मूर्ती घडवताना ऊर्जा मिळते. मूर्ती बनवण्यातून मिळणारा आनंद खूप मोठा आहे. हाच आनंद मिळावा म्हणून गेली तीस-पस्तीस वर्षे मूर्तीला आकार देण्याचे काम आपल्या हातून घडत आहे.
- मंगेश महाडिक.