लांजा : रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सातत्याने होत असलेल्या घरफोड्या तसेच मालमत्तेविषयीचे गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी प्रत्येक पोलीस स्थानकाच्या हद्दीतील सर्व बँका, पतसंस्था, पेट्रोल पंप, सुवर्णकारांची दुकाने तसेच आर्थिक व्यवहारांची संबंधित आस्थापनांना तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे आणि दिवस-रात्र सुरक्षारक्षक नेमण्याचे आदेश रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने काढले आहेत.
ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. त्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या माणसाचा चेहरा स्पष्टपणे दिसेल त्याचबरोबर वाहनांच्या नंबर प्लेट नीट दिसतील अशा पद्धतीने कॅमेरे लावले आहेत का? याची तातडीने तपासणी करण्याचे आदेश प्रत्येक पोलीस स्थानकाला दिले आहेत. आर्थिक व्यवहाराशी संबंधित बँक, पतसंस्था, पेट्रोलपंप अशा ठिकाणी सुरक्षारक्षक नेमले आहेत का याची खात्री करावी. प्रत्येक ठिकाणी जास्तीत जास्त ऑनलाइन व्यवहारावर भर देण्यासाठी वेळोवेळी पोलिसांनी मार्गदर्शन करावे, असे सक्त आदेश देण्यात आले आहेत.
त्याचबरोबर धार्मिक स्थळांच्या ठिकाणीही निगराणीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत का? ज्या ठिकाणी बसविले असतील तर ते चालू स्थितीत आहेत का आणि ज्यांनी अद्याप बसविले नाहीत त्यांना तातडीने बसविण्याचे आदेश काढले आहेत. या आदेशानंतर पोलीस प्रत्येक देवस्थानस्थळी भेट देऊन पाहणी करत आहेत. या आदेशाची प्रत जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या पोलीस निरीक्षकांना तसेच उपविभागीय अधिकारी यांना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे प्रमुख निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी दिले आहेत.