प्रकाश वराडकर -रत्नागिरी -धकाधकीच्या जीवनात मनावर ताण पडणे, मानसिकदृष्ट्या खचणे, न्यूनगंड निर्माण होणे, एखाद्या गोष्टीचा धसका घेणे असे प्रकार सातत्याने होत असतात. मात्र, त्याबाबत निदान करण्यासाठी व आवश्यक उपचारासाठी मनोरुग्णालयात जाण्यास अनेकजण घाबरतात. तेथे गेल्यास वेडा असल्याचा शिक्का बसेल, अशी भीती अनेकांच्या मनात निर्माण होते. मात्र, लवकरच अशा लोकांसाठी जिल्हा रुग्णालयातच मानसोपचार तज्ज्ञांची व्यवस्था केली जाणार असून, स्वतंत्र बाह्यरुग्ण विभाग सुरू केला जाणार आहे. चिंता ही माणसाच्या मनात घर करून राहिली की, त्याच्या विकासाला मारक ठरते. अनेक कारणांनी माणसाला चिंता निर्माण होते. त्यातून काहीजण सावरतात तर काहींना ही चिंंता चितेसारखी जाळत असते. त्यातून नैराश्य निर्माण होते. नकारार्थी विचार मनाचा ताबा घेतात. आपल्यात काय क्षमता आहे, आपण काय करू शकतो, याची जाणीवच मरून जाते. त्यातून न्यूनगंड निर्माण होतात. परीक्षेच्या वेळेला विद्यार्थ्यांच्या मनात अशीच भीती निर्माण होते. काहीवेळा असाध्य आजाराने गाठले आहे, असाही समज निर्माण होतो, त्यातून मन कमकुवत होते. खरेतर या नेहमीच्या जीवनात घडणाऱ्या गोष्टी आहेत. त्याच्यावर मानसोपचारतज्ज्ञाचे सहाय्य का घ्यावे, असे अनेकांच्या मनात असते. त्यामुळे साचलेला नकारार्थी विचारांचा, नैराश्याचा कचरा तसाच उराशी बाळगून अनेकजण जीवन जगत असतात. परंतु त्यासाठी मानसोपचारतज्ज्ञाकडे जाण्याची त्याची हिंमत मात्र होत नाही. रत्नागिरी जिल्ह्यात मनोरुग्णालय आहे. तेथे मानसोपचारतज्ज्ञ उपलब्ध आहेत. अन्य जिल्ह्यात मनोरुग्णालये नाहीत. रत्नागिरीतील मनोरुग्णालयात मानसोपचार तज्ज्ञाला भेटावयास गेल्यास आपणास कोणी पाहिले तर वेडा ठरवतील, अशी भीती वाटत असल्यानेच त्यातून मार्ग काढण्यासाठीच रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात लवकरच मानसोपचारांसाठीचा स्वतंत्र बाह्यरुग्ण विभाग सुरू केला जाणार आहे. प्रथम आठवड्यातून एक दिवस ही सुविधा उपलब्ध होणार असून, रुग्णांच्या प्रतिसादानुसार आठवड्यातून तीन दिवस किवा दररोजही ही सेवा देण्याची रुग्णालयाची तयारी आहे. त्यासाठी चांगले मानसोपचारतज्ज्ञही उपलब्ध करून दिले जाणार आहेत, असे जिल्हा रुग्णालयाच्या सुत्रांकडून सांगण्यात आले.जिल्हा रुग्णालयातच मानसोपचारतज्ज्ञांची व्यवस्था.मनोरुग्णालयात जाण्यास घाबरणाऱ्या रुग्णांना दिलासा.सुरुवातीला आठवड्यातून एक दिवस मिळणार सुविधा.ा्रतिसादानुसार तीन दिवस.चांगले मानसोपचारतज्ज्ञही उपलब्ध करणार; रुग्णालयीन सुत्रांची माहिती.
‘सिव्हील’मध्येच आता मानसोपचारही होणार
By admin | Updated: July 19, 2015 23:34 IST