श्रीकांत चाळके - खेड शहर परिसरात तसेच तालुक्यातील वर्दळीच्या मार्गावर मिडीबस सुरू होणार असल्याचे संकेत दोन वर्षांपूर्वी मिळाले होते. मात्र, अद्याप यावर विचार झालेला दिसत नाही. खेडमध्ये गेली ५ वर्षे विविध भागात चोरटी प्रवासी वाहतूक होत आहे़ एस. टी. कर्मचाऱ्यांच्या सातत्यपूर्ण हलगर्जीपणामुळे या अवैध प्रवासी वाहतुकीने डोके वर काढले आहे. एवढेच नव्हे; तर खेड तालुक्यातील अशा चोरट्या वाहतुकीविरोधात येथील रिक्षाचालकांनी मात्र आपला व्यवसाय धोक्यात आल्याची सांगत दंड थोपटले होते़ याप्रकरणी पोलीस, तहसीलदार आणि रिक्षाचालक - मालक संघटना यांच्यात चर्चा झाली होती. त्यानंतर अवैध प्रवासी वाहतूक बंद करण्यासाठी पर्याय म्हणून तालुक्यातील शिवतर आणि वेरळ फाटा मार्गावर मिडीबस सेवा सुरू करण्याचा निर्णय तत्कालीन आगारप्रमुख बदक यांच्या उपस्थितीत घेण्यात आला होता.यानंतर वारंवार येथील आगारप्रमुखांना विचारले असता प्रशिक्षित चालक नसल्याने वडापला पर्याय देण्याच्या नावाखाली सुरू होणारी ही सेवा काही काळ थांबणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर रूजू झालेल्या आगारप्रमुख आर. वाय. कदम यांनी मे २०१४ अखेर ५ मिडीबस या मार्गावर धावणार असल्याचे सांगितले. मात्र, कदम यांनी त्यानंतर विविध कारणे देऊन शिवतर मार्गावरील जनतेला मिडीबस सेवा सुरू करण्याच्या आशेवर ठेवले. त्यानंतर रस्त्यांची सुरक्षितता पाहूनच ही बससेवा सुरू करण्याचा मनोदय त्यांनी बोलून दाखवला. त्याला आता दीड वर्ष झाले. तालुक्यात १० बसेस धावणार असून, शिवतर मार्गाला अग्रक्रम देण्याची केलेली घोषणा आता हवेत विरली आहे़तालुक्यातील बहुतांश रस्ते खराब व निकृष्ट झाल्याने मिडीबसची वाहतूक करण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होता़ या बसच्या इंजिनची कार्यक्षमता अधिक व चांगली असल्याने रस्तेही चांगले असणे आवश्यक असल्याचे कारण सांगत कदम यांनी मिडीबसला काही अवधी लागणार असल्याचे संकेतही दिले होते. यापैकी ५ बसेस खेडला मे २०१४अखेर मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. यातील खेड रेल्वे स्थानक, शिवतर तसेच हेदली ते सवेणी मार्ग आणि महामार्गावरील लोटेपर्यंत या बसेस धावणार असून, प्रशिक्षित १० नवे चालक खेड आगाराला मिळणार असल्याचे सुतोवाच केले होते. यामुळे अपुऱ्या चालकांची समस्या काहीअंशी सुटणार असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले होते. आता खेड आगारामध्ये तब्बल ३२ चालक नव्याने रुजू झाले आहेत. त्यामुळे या मिडीबसेस सुरू करण्याचे पुन्हा प्रयत्न होतील, ही भाबडी आशा कदम यांच्या विधानाने मावळली आहे. याबाबत आगारप्रमुख कदम यांनी या बसेसचा प्रस्तावही आपण पाठविला नसल्याची माहिती दिली आहे. मिडीबस देण्याबाबतचे अधिकार प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना असल्याने याबाबत आपण काहीही करू शकत नाही. या मिडीबस चोरटी वाहतूक करणाऱ्या आणि दुर्गम भागातील गावांकरिता सुरू करण्यात येतात़ तशी स्थिती खेडमध्ये नसल्याने याबाबत विचार होण्याची सुतराम शक्यता नाही.-आर. वाय. कदम,आगारप्रमुख, खेड
खेडसाठी मिडीबसचे अजूनही स्वप्नच!
By admin | Updated: January 29, 2015 23:40 IST