फोटो: महिपतगडावर दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे श्रमदान करून संवर्धनाची माेहीम हाती घेतली आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील निगुडवाडी येथील महिपतगडावर दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे श्रमदान करून संवर्धनाची मोहीम राबविण्यात आली. या प्रतिष्ठानच्या सदस्यांनी या गडावर दुसऱ्यांदा ही मोहीम राबविली आहे. त्यामुळे आता महिपतगड कात टाकत असून, गडाला नवसंजीवनी मिळत झळाळी आली आहे.
ऐतिहासिक वारसा जपला जावा आणि या अपरिचित किल्ल्यांवरील वास्तूंचे संवर्धन होऊन त्यांना नवसंजीवनी देण्याचे कार्य आपल्या हातून घडावे, हा एकच ध्यास घेऊन दुर्गवीर प्रतिष्ठान गेली १५
वर्षे संवर्धनाचे कार्य अविरतपणे करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून दुर्गवीर प्रतिष्ठानच्या कोकण विभागातर्फे निगुडवाडी येथील महिमतगडावर श्रमदान व संवर्धन मोहीम राबविण्यात आली. दुर्गवीर सदस्यांसहित तालुक्यातील एकूण १३ तरुणांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता. गडावरील महादरवाजासमोर दगड मातीचा ढिगारा पडला होता. तो स्वच्छ केल्याने खूप वर्षांनंतर महादरवाजाने एक मोकळा श्वास घेतला आहे, तसेच बाजूच्या तटबंदीवर दगड रचण्यात आले. या मोहिमेत प्रशांत डिंगणकर, रोहित बालडे, संदेश सुवारे, विनय साठे, अथर्व पावसकर, सौरभ सावंत, धनिष घाग, स्वप्निल साप्ते, गीतेश गोंधळी, साहिल साप्ते, विकेश पर्शराम, लक्षक सनगले, दत्तगुरू मिशाळे हे सदस्य सहभागी होते.
चाैकट
गड बांधण्यात आपला हातभार नसला, तरी गड संवर्धनात सहभाग असला पाहिजे. ही भूमिका या प्रतिष्ठानने घेतली आहे. त्यानुसार, प्रतिष्ठानने आपले कार्य सुरू ठेवले आहे. या शिवकार्यात ज्यांना सहभागी व्हायचे
असेल, त्यांनी दुर्गवीर प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.