विहार तेंडुलकर -रत्नागिरी -विधानसभा निवडणुकीत आघाडी आणि युती तुटल्याने सर्वच पक्षांना स्वत:च्या ताकदीवर लढावे लागले. यामध्ये भाजप हा जिल्ह्यातील तिसरा पक्ष ठरला आहे. पाचपैकी दोन जागा जिंकल्याने राष्ट्रवादी नंबर दोनचा पक्ष ठरला आहे. असे असले तरी भाजपची ताकद मात्र चांगलीच वाढल्याचे दिसून येते. भविष्यात राज्य सरकारची कामगिरी चांगली राहिल्यास या ताकदीला आणखी बळकटी मिळू शकते. त्यामुळे भाजपचा सर्वच ठिकाणी पराभव झाला असला तरी आशेचा अंकुर फुटू लागला आहे.राज्यस्तरावर शिवसेना-भाजपची युती असल्याने जिल्ह्यात नेमकी भाजपची ताकद किती, हे स्पष्ट होत नव्हते. आजपर्यंत दोन्ही पक्ष कोणत्याही निवडणुकीत स्वतंत्रपणे न लढल्याने या ताकदीचा अंदाजही येत नव्हता. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची प्रतिमा सुधारून या पक्षाला चांगले दिवस आल्याचे दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर संपूर्ण राज्यात भाजपला आलेली मरगळ कमी झाली आणि कार्यकर्ते उत्साहाने कामाला लागले. मात्र, त्याच्या उलट परिणाम रत्नागिरीत झालेला दिसून येतो.जिल्ह्यात भाजपची असलेली ताकद ही दुर्लक्षून चालणारी नाही. मात्र, रत्नागिरी आणि गुहागरवगळता जिल्ह्यातील अन्य मतदारसंघात भाजप खूपच कमजोर असल्याचे दिसून येते. त्याठिकाणी भाजपने म्हणावी तेवढी मते घेतलेली नाहीत. रत्नागिरीत हमखास विजयासाठी भाजपचा हुकमी एक्का असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा घेण्यात आली. मात्र, तरीही भाजपची ताकद म्हणावी तेवढी वाढलेली दिसून आली नाही. त्याला अनेक कारणेही आहेत.सन २००९मध्ये झालेल्या मतदारसंघांच्या फेररचनेत जिल्ह्यातील सातचे पाच मतदारसंघ करण्यात आले. त्यामध्ये संगमेश्वर आणि खेड मतदारसंघांची नावे पुसली गेली. खेडमधून शिवसेनेच्या रामदास कदम यांचे पुनर्वसन कोठे करावे? असा प्रश्न निर्माण झाला आणि त्यांना गुहागर हा पारंपरिक भाजपचा मतदारसंघ बहाल करण्यात आला. त्यावेळी नाराज झालेले भाजपचे तत्कालीन आमदार विनय नातू यांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून अर्ज भरला. त्यामुळे युतीची मते विभागली आणि रामदास कदम यांना पराभव पत्करावा लागला. या जुन्या राजकारणाचा प्रभाव याही निवडणुकीत दिसून आला.युती असताना जुन्या मतदारसंघाप्रमाणे भाजपकडे दोन, तर शिवसेनेकडे पाच, तर नव्या मतदारसंघ रचनेप्रमाणे शिवसेनेकडे चार, तर भाजपकडे दोन असे जागा वाटप होते. त्यामुळे जी जागा ज्या पक्षाच्या वाट्याला होती, त्याचठिकाणी तेथील कार्यकर्ते स्वत:चा पक्ष वाढवण्यासाठी झटताना दिसत होते. त्यामुळे याही विधानसभा निवडणुकीत पाहिले तर रत्नागिरी आणि गुहागर मतदारसंघ वगळता अन्यत्र भाजपची मते ही खूपच कमी झालेली आहेत. कारण प्रत्येक ठिकाणी युती आहे, हे गृहीत धरूनच भाजपने पक्षाचा विस्तार केला. आता आयत्यावेळी शिवसेनेशी असलेली युती तुटल्यानंतर स्थानिक भाजपा उमेदवारांवर डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे. विजयासाठी शिवसेनेच्या मतांवर अवलंबून असलेले भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वतंत्र अस्तित्व निर्माण न केल्याने भाजपवर या निवडणुकीत नामुष्की आली. तरीही भाजपची ताकद दुर्लक्ष करण्याएवढी नक्कीच कमी नाही. कारण दापोली, रत्नागिरी, गुहागर या मतदारसंघात भाजपने अपेक्षेपेक्षा जास्तच मते घेतली आहेत आणि विशेष म्हणजे शिवसेनेसाठी भाजपच्या पक्षवाढीची ही धोक्याची घंटा होऊ शकते, हेही सत्य निवडणुकीत दिसून आले. मात्र, स्वबळाची भाषा करणाऱ्या भाजपला पक्षवाढीसाठी अजून खूप काम करावे लागणार आहे, ही शिकवण या निवडणुकीतून भाजपला मिळालेय, एवढं नक्की!
जिल्ह्यात कमळ उमलतंय, पण...
By admin | Updated: October 20, 2014 22:30 IST