मंडणगड : उंबरशेत बंदर या ठिकाणी अनेक कारणांसाठी कांदळवनाची मोठ्या प्रमाणावर तोड झाली आहे. या ठिकाणी सुमारे एक किलोमीटरच्या अंतरात रस्ता तयार करण्यासाठी मॅग्रो व अन्य संरक्षित समुद्री वनस्पतींच्या शेकडो झाडांची कत्तल झालेली असताना महसूल व वन विभागाला झाल्या प्रकाराची वास्तवदर्शी माहिती नसल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे़ यासंदर्भात घटनास्थळ व ग्रामस्थांमध्ये सुरु असलेल्या चर्चेतून मिळालेल्या माहितीनुसार उंबरशेत बंदर येथे एक कंपनी (जिचे नाव कळू शकलेले नाही) अजूनही माहीत नसलेल्या कारणांसाठी गेल्या दीड महिन्यापासून खाडी किनाऱ्यालगत रस्ता तयार करण्याचे काम करीत आहे. त्यासाठी मुख्य रस्त्याला लागून नऊ मीटर रूंदीचा व सुमारे एक किलोमीटर लांबीचा दगड मातीची भर टाकून रस्ता तयार करण्यात आला आहे़ सावित्री खाडीलगत असलेल्या कांदवळनाच्या रानातून सुमारे आठशे ते नऊशे मीटर लांबीचा रस्ता तयार करण्यात आला आहे. त्यासाठी सुमारे तीस ते चाळीस वर्षांपूर्वीची मॅग्रोज, काड आमटी व अन्य दुर्मीळ जातींच्या वृक्षांची तोड करण्यात आली आहे. याशिवाय कांदळवनाची तोड करून जेटी बनवण्यासाठी या रस्त्याला शंभर मीटरचा बायपास रस्ता नदीपाराजवळ जाण्यासाठी तयार करण्यात आला आहे़ हा रस्ता तयार करण्यासाठी अत्याधुनिक मशिनरीच्या साह्याने महिनाभर जोरात काम सुरु आहे. यासंदर्भात प्रशासकीय यंत्रणेकडून कोणतीही माहिती उपलब्ध होत नाही. ग्रामस्थांनी याबाबत अद्याप कोणतीही तक्रार केलेली नाही. गावचे पोलीसपोटील व तलाठी यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार उंबरशेत बंदर या ठिकाणी शिपिंग कंपनीसाठी रस्ता होत होता. यासंदर्भात ग्रामस्थांना कल्पना होती. पण, कोणीही ग्रामस्थ तक्रारीसाठी पुढे येत नव्हता. सुमारे पंधरा दिवसांपूर्वी मातीचे उत्खनन होत असल्याची तक्रार झाली. यासंदर्भात तलाठी पंचनाम्याला जाग्यावर गेले असता येथील रस्त्याच्या कामाची मशिनरी जाग्यावरून हलविण्यात आली. प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी पोहोचूनही केवळ माती उत्खननाचा पंचनामा करण्यात आला. कांदळवनाच्या तोडीकडे महसूल प्रशासनाने अद्याप लक्ष देलेले नाही अथवा वनविभागाचे कर्मचारीही जागेवर पोहोचलेले नाहीत. महसूल विभाग सखोल पंचनामा करणार असल्याची माहिती मिळाली आहे.़ महसूल विभागाने संबंधित ठिकाणी ५०० ब्रास मातीचा उपसा करण्यासाठी कंपनी व्यवस्थापकांनी काही रक्कम भरल्याचे पंचनामा केल्यानंतर पुढे आले आहे. स्थानिक ग्रामस्थ, पोलीसपाटील, महसूल विभाग, वनविभाग या सर्वांचीच मिलीभगत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तोडीचे प्रकरण गंभीर असून, अनेक विकासकांनी खाडी किनाऱ्यालगत असलेले आपले प्ल्ॉाट्स डेव्हलप करण्यासाठी कांदळवने साफ करुन त्या ठिकाणी भराव केला आहे. अधिकारी लक्ष देत नसल्याने या सर्व प्रकाराची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्याची मागणी परिसरातून केली जात आहे. करावी. (प्रतिनिधी)
उंबरशेतमध्ये कांदळवनाची होतेय कत्तल
By admin | Updated: April 4, 2015 00:10 IST