रत्नागिरी : कोरोनाच्या पहिल्या लाटेत ० ते २० वर्षांपर्यंतचा वयोगट सुरक्षित होता. मात्र, दुसऱ्या लाटेचा संसर्ग अधिक वेगाने झाला असल्याने गेल्या चार महिन्यांत जिल्ह्यातील ० ते १७ वयोगटातील मुले कोरोनाबाधित झाली आहेत. यात ६ वर्षांपर्यंतच्या बालकांची संख्या १,०९३ असून, ४ नवजात बालकांचा समावेश आहे. ७ ते १२ वयोगटातील २,१२७ आणि त्यावरील १७ वर्षांपर्यंतची संख्या २,५२७ इतकी आहे. एकूण रुग्णांच्या तुलनेत मुलांचे बाधित होण्याचे प्रमाण ११.१५ टक्के आहे.
जिल्ह्यात मार्च २०२०मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. पहिल्या लाटेपर्यंत कोरोनाबाधितांची एकूण संख्या साडेदहा हजारपर्यंत होती. मार्च २०२१पर्यंत म्हणजे वर्षभराची ही संख्या होती. यात ४२ बालके बाधित झाली होती. मात्र, एप्रिल २०२१पासून कोरोनाचा संसर्ग पुन्हा वेगाने वाढू लागला आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर होळीसाठी रत्नागिरी जिल्ह्यात विविध ठिकाणी दाखल झालेल्या चाकरमान्यांकडून मुंबईतून कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात अधिक फैलावला गेला. त्यामुळे एप्रिल महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या अधिक वाढू लागली.
रुग्णसंख्या वाढू लागल्याने कोविड रुग्णालये, केअर सेंटर्स भरून गेली. त्यामुळे गंभीर झालेल्या रुग्णांना उपचार मिळणे अवघड झाले. त्यामुळे शासनाने ज्यांच्यात साैम्य लक्षणे आहेत किंवा अजिबातच लक्षणे नाहीत, अशांना घरीच राहून उपचार करण्याची परवानगी दिली. हे रुग्ण घरी राहिले असले तरी काहींच्या घरात स्वतंत्र राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे अशांमधून घरातील इतर सदस्यांना संसर्ग झाला. विशेषत: ज्येष्ठ नागरिक, मुले ही मोठ्या प्रमाणावर बाधित होऊ लागली. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या भरमसाठ वाढू लागली.
१ मे ते ३० ऑगस्ट २०२१ या चार महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५१ हजार ५२७ इतकी झाली. यापैकी ० ते १७ या वयोगटाची संख्या ५ हजार ७४७ (११.१५ टक्के) इतकी आहे. यात ४ नवजात शिशूंचा समावेश आहे. ६ वर्षांपर्यंतची एकूण बालके १०९३, ७ ते १२ पर्यंतची २ हजार १२७ आणि त्यावरील १७ वर्षांपर्यंतच्या मुलांची संख्या २ हजार ५२७ इतकी आहे.
..................
लक्षणे नसलेल्यांमुळे संसर्ग वाढला...
ज्यांच्यात कोरोनाची लक्षणे नव्हती, अशांचा वावर अनेक ठिकाणी झाला. अशांमुळे कोरोनाची रुग्णसंख्या अधिक वाढली. आतापर्यंत ७५ हजार इतकी रुग्णसंख्या आहे. त्यापैकी ५१ हजार ५२७ एवढे रुग्ण केवळ मे ते ऑगस्ट या केवळ चार महिन्यांच्या कालावधीत वाढले.
....................................
दुसऱ्या लाटेत बालकांची संख्या वाढली...
पहिल्या लाटेच्या वर्षभराच्या कालावधीत सुमारे ४२ बालके कोरोनाबाधित झाली होती. गतवर्षी कोरोनाने निधन झालेले बालरोगतज्ज्ञ डाॅ. दिलीप मोरे यांच्या अथक प्रयत्नांमुळे ही सर्व बालके पूर्णपणे कमी कालावधीत बरी झाली होती. त्यामुळे एकही मृत्यू नोंदविला गेला नव्हता. मात्र, दुसऱ्या लाटेदरम्यान मुलांचे बाधित होण्याचे प्रमाण वाढले. १६ वर्षांची एक मुलगी उशिरा उपचारासाठी दाखल झाल्याने तिचा मृत्यू झाला, तर अन्य दोन बालरुग्ण सहव्याधी असल्याने त्यांचा मृत्यू झाला. ० ते १७ वयोगटातील तीन मृत्युंची नोंद दुसऱ्या लाटेत झाली.
तिसऱ्या लाटेत काळजी घेण्याची गरज...
संभाव्य तिसऱ्या लाटेत बालकांना अधिक बाधित होण्याचा धोका व्यक्त होत आहे. सध्या अनेक बालके मोठ्या प्रमाणावर बाधित होत आहेत. तिसऱ्या लाटेचा संसर्ग होण्याचा वेग अधिक असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे दुसऱ्या लाटेत बाधित झालेल्या ० ते १७ वयोगटातील मुलांची संख्या पाहता तिसऱ्या लाटेपासून मुलांना दूर ठेवण्यासाठी पालकांनी अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे.