रत्नागिरी : शहरातील मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या मागे असलेल्या सोहम समर्थ अपार्टमेंटच्या बी विंगमधील एक फ्लॅट आज अज्ञात चोरट्यांनी दुपारनंतर फोडला. यात फ्लॅटच्या तिजोरीतील ९ तोळे वजनाचे २ लाख ५२ हजार बाजारमूल्य असलेले सोन्याचे दागिने व २ हजार रुपये रोख रक्कम असा सुमारे २ लाख ५४ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. दुपारी १ ते ४.३० वाजताच्या दरम्याने ही घटना घडली. याप्रकरणी फ्लॅटमालक गणपत केशव खरंबळे (४२, हिंदू कॉलनी, रत्नागिरी) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गणपत खरंबळे हे तलाठी असून, ते कामावर गेले होते. त्यांच्या पत्नी रचना खरंबळे मुलगा परीक्षेत पास झाल्याचे पेढे देण्यासाठी मुलासह शहरातच आपल्या नातेवाईकांकडे दुपारी १ वाजता गेल्या होत्या. दुपारी ४.३० वाजता गणपत खरंबणे हे कामावरून घरी आले असता आपला फ्लॅट फोडलेला असल्याचे पाहून त्यांना धक्काच बसला. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. चोरट्यांनी कटावणीच्या सहायाने सुरक्षित लोखंडी दरवाजाची कडी तोडली. त्यानंतर मुख्य दरवाजाचा ब्रासचा कडी-कोयंडा कटावणीने उचकटला. आतील कपाटाची तिजोरी फोडून त्यातील ९ तोळ्याचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये ३५ गॅ्रमचे सोन्याचे मंगळसूत्र, २० गॅ्रमच्या दोन सोन्याच्या बांगड्या, प्रत्येकी ३ ग्रॅमच्या दोन अंगठ्या, ९ ग्रॅमचे इयरिंंग व त्याच्या सोनसाखळ्या, १८ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी व नथ तसेच २ हजार रोख रक्कम यांचा समावेश आहे. महिनाभरापूर्वीच रत्नागिरीतील सन्मित्रनगर भागात एकाच वेळी १९ फ्लॅट चोरट्यांनी फोडले होते. त्या घरफोड्यांप्रकरणी अद्यापही तपास सुरू असून, चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्यातच आता हा फ्लॅट फोडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)
रत्नागिरीत अडीच लाखांचे दागिने लंपास
By admin | Updated: June 24, 2014 01:42 IST