रत्नागिरी : जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागात पर्यवेक्षीय यंत्रणा म्हणून कार्यरत असलेले केंद्रप्रमुख हे शैक्षणिक गुणवत्तावाढीचे काम करतात. १९९५ पासून ही पदे प्रत्यक्ष अस्तित्वात आली. त्यांच्या केंद्रशाळा अंतर्गत अधिकाधिक जिल्हा परिषद व खासगी किमान १५ ते २५ शाळा केंद्रप्रमुखांच्या अधिनस्त असतात. केंद्रप्रमुखांच्या पदाला २५ वर्षे पूर्ण झाली असून, या काळात जिल्हा तांत्रिक सेवेत समावेश झाला नसल्याने त्यांना वर्ग-२ पदोन्नतीची व अन्य लाभांची संधी प्राप्त झालेली नाही. त्यामुळे केंद्रप्रमुखांचा जिल्हा तांत्रिक सेवेत समावेश करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघाने केली असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाबाजी शिर्के यांनी दिली आहे.
केंद्रप्रमुखांना जिल्हा तांत्रिक सेवा (श्रेणी-२ ) मध्ये समाविष्ट करून उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदाची पदोन्नती देण्याबाबत राज्य संघटनेेच्या वतीने राज्याध्यक्ष अशोकराव महाले यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे मागणी केली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शिर्के यांनी दिली. राज्यातील केंद्रप्रमुखांच्या मंजूर ४,८६० पदांपैकी केवळ तृतीयांश पदे कार्यरत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातही केंद्रप्रमुखांकडे अतिरिक्त केंद्राचा प्रभार देण्यात आला आहे. जिल्ह्यात एकूण २५२ केंद्रे आहेत. सेवानिवृत्ती तसेच विस्तार अधिकारी पदोन्नतीने अनेक जागा रिक्त झाला आहेत. आजअखेर १३९ जागा रिक्त असून, केवळ ११२ केंद्रप्रमुख कार्यरत आहेत. मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असल्याने त्या भरण्याबाबत संघटनात्मक प्रयत्न सुरू आहेत. केंद्रप्रमुखांच्या रिक्त असलेल्या सर्व जागा शिक्षकांमधून भरण्यासंदर्भात संघटनेकडून मागणी करण्यात येत असल्याचेही जिल्हाध्यक्ष शिर्के यांनी सांगितले.
रिक्त पदांची तालुकानिहाय माहिती खालीलप्रमाणे
तालुका रिक्त पदे
मंडणगड १०
दापोली १२
खेड १६
चिपळूण १५
गुहागर १५
संगमेश्वर २१
रत्नागिरी १२
लांजा १४
राजापूर २४