कडाक्याच्या थंडीत आकाशाच्या छताखाली झोपलेल्या एखाद्या उघड्या गरीब माणसाला पाहून मनात दयेचा अंकुर फुटत नाही... एखाद्या होतकरू मुलाचं शिक्षण पैशाअभावी थांबतंय, असं समजल्यानंतरही मदत करण्याची इच्छा मनात निर्माण होत नाही... पण एखादा अपघात झाला तर बसची तोडफोड कर, चालक-वाहकाला बेदम मारहाण कर, असे प्रकार मात्र आपल्याला पटकन् जमतात. घटना काय घडली आहे, याची धड माहितीही नसते. जे काही घडतं त्याच्याशी संबंधही नसतो. (खरं तर जो माणूसकीचा संबंध दिसायला हवा आणि जखमींना मदत करायला हवी ती कोणी करत नाही.) पण चालक - वाहकावर पडणाऱ्या हातांमध्ये अनेकांचे हात नकळत वाढत जातात. हे कशाचं लक्षण आहे? आपण संवेदनशील आहोत, याचं? जर आपण संवेदनशील असू, तर एखाद्या गरिबाला पाहून आपल्याला क्षणभर का होईना कळवळून का येत नाही? एखाद्या गरिबाला उपदेशापेक्षा आपल्यातला एखादा घास देण्याची इच्छा का होत नाही? याचं कारण म्हणजे आपली संवेदनशीलता अतिशय ढोंगी आहे. स्वार्थी आहे. तकलादू आहे. रत्नागिरी तालुक्यातील साखरतर येथे दिसलेली संवेदनशीलता ही याच प्रकारातली.जो ठरवून होतो, तो घातपात आणि जो अचानक, नकळत होतो तो अपघात. एखादा घातपात हा ठरवूनच केला जातो. त्यामागे काही विशिष्ट हेतू असतो. त्यात कोणाचं तरी मुद्दाम नुकसान करायचंच असतं. अपघात मात्र ठरवून केलेला नसतो. त्यामागे कुणाला दुखापत करण्याचा हेतू नसतो. थोड्या काळजीने अपघात रोखता येतात. पण ही काळजी घेतली नाही किंवा निष्काळजीपणा दाखवला गेला तर त्या संबंधिताला शिक्षा करण्यासाठी कायदा आहे. त्यासाठी विशिष्ट यंत्रणा आहेत. पण, या यंत्रणांना झुगारून देत कायदा आपल्या हातात घेऊन आपली संवेदनशीलता दाखवणाऱ्यांना ढोंगी म्हणणार नाहीतर काय?रत्नागिरी तालुक्यातील साखरतर येथे अपघात झाला. एक वृद्ध माणूस बसमध्ये चढत असताना चालकाने गाडी सुरू केली आणि त्यामुळे ते वृद्ध गृहस्थ खाली कोसळले. सुरू झालेल्या बसचे मागचे चाक त्यांच्या पायावरून गेले. या घटनेत चालकाची चूक आहे. काही प्रमाणात त्याला वाहकही जबाबदार आहे. कुठल्याही थांब्यावर प्रवासी बसमध्ये चढेपर्यंत गाडी थांबवून ठेवण्याची जबाबदारी या दोघांचीही आहे. कुठल्याही कारणाने असेल तरी त्यात त्यांनी कुचराई केली आहे. अर्थात त्यासाठी कायदा आहे. त्या चालक-वाहकांचे खाते आहे. चौकशी करण्यासाठी काही यंत्रणा आहे. पण या कसल्याही गोष्टीचा विचार न करता एका वृद्ध माणसाच्या पायावरून बसचे चाक गेल्याची घटना आसपासच्या लोकांच्या मनाला इतकी भिडली की, त्यांनी पुढचा मागचा विचार न करता चालकाला बेदम मारहाण केली. एवढ्यावरच हे लोक थांबले नाहीत तर त्यांनी महिला वाहकालाही तेवढीच बेदम मारहाण केली.झालेली घटना चालक-वाहकाने मुद्दाम केली होती का? त्या वृद्धाला मारण्याचा हेतू ठेवून त्यांच्या अंगावर गाडी घातली गेली का? या गोष्टींचा विचार करावा, असं कोणालाही वाटलं नाही. चालक - वाहक ही माणसेच आहेत, हेही कोणाच्याही मनात आले नाही. वाहक एक महिला आहे, याचे भानही या संवेदनशील लोकांना राहिले नाही.ही एकच घटना नाही. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी अशाच घटना घडताना दिसू लागल्या आहेत. हे स्थिर समाजाचे लक्षण नाही. ही सामाजिक अस्थिरता कशातून आली आहे? आपलं अस्तित्त्व सिद्ध करणे, असा त्यामागे हेतू आहे का? कुठला तरी राग कुठेतरी व्यक्त करण्याची भूमिका यामागे आहे का? सामाजिक शांततेला धक्का बसवण्यामागे नेमके हेतू काय आहेत? असे सामाजिक शांततेला बाधा आणणारे प्रसंग टाळणे, थोपवणे कुणाच्याच हातात नाही का? जर हे प्रकार वेळीच रोखले गेले नाहीत तर कोकणचे शांतपणाचे वैशिष्ट्य पुसले जाईल.एखाद्या जवळच्या नातेवाईकाबाबत असा प्रकार झाला तर साहजिकच अपघाताला कारणीभूत लोकांविरूद्ध मनात तीव्र संतापाची भावना निर्माण होते. ही बाब अतिशय स्वाभाविक आहे. पण अशा व्यक्ती कुणालाही मारझोड करायला सांगत नाहीत. अशा मारहाणीत एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याला जबाबदार कोण? त्याच्या कुटुंबाची जबाबदारी घेण्यास कुणी पुढे येणार आहे का? असे अनेक प्रश्न निर्माण होतात.अशा प्रसंगांमध्ये राजकीय नेते आपल्या मतांचाच विचार करतात. सामाजिक शांततेला धक्का पोहोचवतील, अशा प्रतिक्रिया कधी उमटू नयेत, यासाठी ते पुढाकार घेत नाहीत. प्रशासन कधीही घटना घडायची वाट पाहतं. घटना घडेपर्यंत आणि त्याबाबतची तक्रार आमच्याकडे येईपर्यंत आम्ही काहीच करू शकत नाही, असे सांगत सगळ्याच यंत्रणा हात झटकू पाहतात. मग असे प्रकार थांबवायचे कोणी? प्रत्येक अपघातावर, प्रत्येक दुर्घटनेवर अशीच तीव्र प्रतिक्रिया उमटत राहिली तर सामाजिक शांतता अस्तित्त्वात राहील का?कुठलाही आजार होण्याआधीच प्रतिबंधात्मक उपाय योजले तर आजारपणाचे त्रास वाचतात. संवेदनशीलतेचे समाजविघातक दर्शन घडवणारे प्रसंग टाळायचे असतील तर सामाजिक प्रबोधन ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. एखाद्या गावातल्या दारूच्या भट्टीमुळे शेकडो घरे उद्ध्वस्त होतात. पण म्हणून कोणी संवेदनशीलता दाखवत हीच दारूची भट्टी उखडून टाकण्याचा प्रयत्न करत नाही. तिथे संवेदनशीलता दाखवणं गरजेचं आहे, ती दिसत नाही. पण नको त्या प्रसंगात मात्र ती आवर्जून दिसते. हे वेळीच थांबायला हवं.एस्. टी. महामंडळही फार सौजन्यपूर्ण लोकांचे बनलेले आहे, असे कोणी भाबडेपणाने म्हणू नये. सर्वसामान्य प्रवाशांना योग्य उत्तरे मिळत नाहीत, योग्य वागणूक मिळत नाही, असे अनेक कर्मचारी या महामंडळात आहेत. थांब्यावर शाळकरी मुले उभी असतानाही बस न थांबवणारे महाभाग दिसतात. पण त्यांच्यावर कारवाई करायला यंत्रणा आहे. तिथे कोणी कायदा हातात घेण्याची गरज नाही. पण कायद्याला न जुमानण्याची वृत्ती अलिकडे मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याला राजकीय पाठिंबा हेही एक कारण आहे. म्हणून असले प्रकार वेळेतच थांबवले नाहीत तर माणसांच्या कायद्याऐवजी इथे जंगलचे कायदे लागू होतील. चालकाला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करण्याची वृत्तीच कायद्याला धाब्यावर बसवणारी आहे, हे लक्षात येते. त्याला कायद्याने नाही तर सामाजिक प्रबोधनाने आवर घालायलाच हवा. पण पुढाकार घेणार कोण?-- मनोज मुळ््ये.
संवेदनशीलतेचा ढोंगीपणा..!
By admin | Updated: July 10, 2015 22:26 IST