जाकादेवी : गेल्या तीन आठवड्यात परिसरातून शेकडो टन आंबा कॅनिंगसाठी पाठवण्यात आला. आंबा हंगाम अंतिम टप्प्यात आला असल्याने मिळेल तो दर पदरात पाडून घेऊन बागायतदार कॅनिंगमध्ये आंबा पाठवू लागले आहेत.जाकादेवी येथे राजू देसाई गेली २० वर्षे आंबा व्यवसाय करत आहेत. आंबा पेट्या पाठवण्याबरोबरच ते कॅनिंगसाठीही आंबा खरेदी करतात. मोठे सप्लायर्स आंबा त्यांच्याकडून खरेदी करुन मोठ्या कॅनिंग फॅक्टरीत पाठवतात. त्यांच्यासोबतच गणी, महाकाळ आणि मुकेश देसाई अन्य छोटे व्यावसायिकही हा व्यवसाय करीत आहेत. त्यांच्याकडून रोज अडीच ते तीन टन आंबा कॅनिंगसाठी पाठवला जातो. गेले चार आठवडे म्हणजे २४ एप्रिलपासून हा कॅनिंगसाठीचा आंबा खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरु आहे. आतापर्यंत शेकडो टन आंबा कॅनिंगसाठी पाठवण्यात आल्याची माहिती या व्यावसायिकांनी दिली.हा आंबा व्यावसायिक २७.५० ते २८ रुपये किलो दराने खरेदी करतात व ५० पैसे ते १ रुपया नफा घेऊन मोठ्या पुरवठादारांना विकतात. पुरवठादार दररोज संध्याकाळी आपली गाडी घेऊन या व्यावसायिकांनी गोळा केलेला आंबा घेऊन जातात. रत्नागिरीत स्थानिक ठिकाणाबरोबरच बलसाड (गुजरात), वारणा, भिलवली येथील मोठ्या कॅनिंग फॅक्टरीमध्ये हा आंबा पाठवला जातो.हापूस हंगामाबाबत राजू देसाई यांनी सांगितले की, नोव्हेंबरडिसेंबरच्या दरम्यान मोहोर आलेल्या झाडांचा आंबा फेब्रुवारीमध्ये तयार होतो. त्याला सुमारे १२० दिवस लागतात. जानेवारी - फेब्रुवारीमध्ये मोहोर आलेल्या झाडांचा आंबा ९० दिवसात तयार होतो. हापूसला उष्णता चांगली मिळत असल्याने त्याला तयार होण्यास ९० दिवस लागतात. आंबा पिकायला ८ ते १० दिवस लागतात, तर १२० दिवसात तयार होणारा आंबा १५ दिवसांनी पक्व होतो, असे त्यांनी सांगितले. कॅनिंगच्या या व्यवसायाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, या व्यवसायातून मला शेवटी ३० ते ४० हजार रुपये मिळतात. यामध्ये माझी मेहनत, सोबत ७ ते ८ मजूर लोक, गाडीभाडे वजा जाता ४० ते ५० हजार मिळतात, असे ते म्हणाले.बऱ्याच वेळा कॅनिंग आंबा खरेदी विक्री सुरु झाली की, कधीकधी चोरीचा थांबाही स्टॉलवर येतो. पण अनोळखी बागा नसलेला असा इसम किंवा महिला आढळली व ती आंबा विक्रीसाठी आली तर शक्यतो त्यांच्याकडून आंबा घेणे टाळतो. कारण तो आंबा चोरीचा असतो, हे लक्षात येते. तो नाकारण्याच्या मागे अशा लोकांनी आंबा चोरुन आणू नये, हाच उद्देश असतो. त्यामुळे चोरीला आळा घालण्याचा तो एक प्रयत्न आम्ही करीत असतो, असे ते म्हणाले.आंबा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. त्याचबरोबर अवकाळी पावसामुळे हाताशी आलेला आंबा जाऊ नये म्हणून शेतकरी - बागायतदार कॅनिंगसाठी आंबा घालत असल्याचे दिसून येते. (वार्ताहर)आंबा हंगामात सुरुवातीपासूनच म्हणजे आॅक्टोबर - नोव्हेंबरपासून झाड मोहोरण्याच्या वेळापासून सातत्याने बदलणाऱ्या वातावरणामुळे आंबा पिकाला फटका बसतो. त्यामुळे आंबा उत्पादनात झालेली घट पाहता आंब्याचे दर अजून चढा असल्याचे चित्र आहे. वाशी मार्केटला पाठवण्यापेक्षा स्टॉल उघडून झाडाच्या सावलीला हमरस्त्यावर आंबा विक्री करण्याकडे छोट्या बागायतदारांचा कल आहे. त्यामुळे गणपतीपुळे - निवळी मार्गावर छोटे शेतकरी आंबा विक्रीचा व्यवसाय करतात. दोन डझनाचा बॉक्स ४०० रुपये व ६० आंब्यांची किंवा ४८ आंब्यांची पेटी हजार ते बाराशे रुपये दराने विकत आहेत. अगदी सुरुवातीला दोन ते अडीच हजार रुपये असलेली पेटी चिंता निर्माण करणाऱ्या वातावरणामुळे एक हजारपर्यंत खाली आली आहे.
जाकादेवी परिसरातून शेकडो टन आंबा कॅनिंगसाठी रवाना
By admin | Updated: May 20, 2015 23:57 IST