मंदार गोयथळे - असगोली -शिक्षकदिनाच्या दिवशी शालेय विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृहाची उपलब्धता करुन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अग्रक्रम देण्याचा मनोदय व्यक्त केला. त्याच अनुषंगाने गुहागर तालुक्याचा आढावा घेतला असता जिल्हा परिषदेच्या शाळांबरोबर खासगी शाळा व माध्यमिक विद्यालयात स्वच्छतागृहे असल्याचे निदर्शनास आले. परंतु अनेक ठिकाणी स्वच्छतागृहाची स्वच्छता हीच चिंतेची बाब असल्याचेही समोर आले आहे.गुहागर तालुक्यात एकूण २४४ शाळा आहेत. यामध्ये पहिली ते चौथीपर्यंत १२५ शाळा, पहिली ते सातवीपर्यंत ८५, माध्यमिक विद्यालय २७ व खाजगी प्राथमिक शाळा ७ यांचा समावेश आहे. गुहागर तालुक्यामधील सर्वच्या सर्व शाळांमध्ये स्वच्छतागृहे आहेत. परंतु अनेक शाळांमध्ये स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेसाठी लागणारे साहित्य, पुरेसे पाणी उपलब्ध नाही. अनेक स्वच्छतागृहांमध्ये पुरेसा प्रकाश नाही. स्वच्छतागृहांसाठी टाकीची व्यवस्था नसल्यसाने येणारी दुर्गंधी अशा विविध समस्या आहेत. या समस्या सोडवण्याचा विचार शाळा व्यवस्थापन समिती वा शिक्षक विचार करत नसल्याने प्रश्न जैसे थे आहेत.जिल्हा परिषद शाळांमध्ये स्वच्छतागृहे साफ करण्यासाठी परिचर कोठून आणणार, साफसफाईसाठी लागणारे फिनेल, पावडर इत्यादी साहित्य कोणत्या खर्चातून आणायचे असे प्रश्न शिक्षकांसमोर आहेत. सर्व शिक्षा अभियानातून शाळा देखभाल अनुदान मिळते परंतु ते इतके तुटपुंजे असते की त्यामधून इतर खर्चांनाच पैसे कमी पडतात. शाळांमधील पाण्याची व्यवस्थाही गावातील नळपाणी योजनेच्या माध्यमातून केली आहे. परंतु अनेक ठिकाणी साठवण टाकीत पाणी चढत नाही. पुरेसे पाणी येत नाही. अशा समस्या आहेत. रोजच्या वापराचे पाणी शिक्षक आणि विद्यार्थी भरुन ठेवतात. पण स्वच्छतागृहासाठी जास्तपाणी आवश्यक असते. ते कोठून आणणार? असा प्रश्न शाळांना पडला आहे.माध्यमिक शाळांमध्ये तुलनेने बरी स्थिती आहे. या शाळांमधून विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने स्वच्छतागृहांची सफाई करणे अनिवार्यच ठरते. शिवाय निधी आणि परिचर यांची उपलब्धता असल्याने साफसफाईकडे लक्ष पुरवले जाते. याबाबत गुहागरचे गटशिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे यांनी सांगितले की, सर्व शिक्षा अभियानाचा फायदा सर्व शाळांना झाला आहे. यातूनच गुहागर तालुक्यातील प्रत्येक शाळेत विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी वेगवेगळी स्वच्छतागृहे उभी राहिली आहे.भारत सरकार आणि युनिसेफ यांच्या माध्यमातून दरवर्षी शैक्षणिक विकास निर्देशांक निश्चित करण्यासाठी सर्वेक्षण केले जाते. यामध्ये शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच भौतिक गरजांची उपलब्धता ही तपासली जाते. गुहागर तालुक्याने रत्नागिरी जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट निर्देशांक मिळवत प्रथम क्रमांक मिळवला आहे तर राज्यात द्वितीय क्रमांक मिळवला आहे. यावरुनच गुहागर तालुक्याचा शिक्षण विभाग, शाळा व्यवस्थापन समिती भौतिक सुविधांच्या बाबतीत विद्यार्थ्यांची काळजी घेतो हे स्पष्ट होते.
गुहागर तालुका : ‘गृह’ आहे पण ‘स्वच्छता’ नाही
By admin | Updated: September 20, 2014 00:22 IST